

जनआक्रोशचे अभिनव आवाहन
नागपूर (nagpur),9 ऑक्टोबर
आपले रक्षण करणा-या शस्त्राची दस-याच्या दिवशी पूजा करण्याची परंपरा शतकानुशतकांपासून चालत आलेली आहे. ‘हेल्मेट’ हे देखील आपले रक्षण करणारे शिरस्त्राण असून त्याचीदेखील शनिवारी, 12 ऑक्टोबर रोजी असलेल्या दसरा सणाला पूजा करावी, असे अभिनव आवाहन रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्य करणा-या जनआक्रोश या सामाजिक संस्थेने केले आहे.
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करून कोणत्याही युद्धावर गेल्यास त्यात विजय निश्चित प्राप्त होता, असे म्हटले जाते. जनआक्रोश ही संस्था रस्ते अपघातांमध्ये होणा-या जीवित हानीच्या गंभीर समस्येवर विजय प्राप्त करायण्यासाठी मागील बारा वर्षांपासून जनजागृतीचे कार्य करीत आहे. नवरात्रीमध्ये जनआक्रोशनने रस्ते सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयांमध्ये हेल्मेट पूजनाचे कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यास प्रारंभ केला आहे.
याचाच दुसरा टप्पा म्हणून दस-याला शस्त्रांसोबतच रक्षणकर्ता ‘हेल्मेट’चेही सर्वांनी घरोघरी वैयक्तिकद्ष्ट्या पूजन करावे. हेल्मेट हे आधुनिक काळातील शिरस्त्राण असून जसे दस-याला शस्त्रपूजनामध्ये स्वसंरक्षणासाठी पुढे केली जात असलेली ढाल पुजली जाते तसेच, आपल्या शिराचे रक्षण करणारे हेल्मेटदेखील पूजले गेले पाहिजे, असे रविंद्र कासखेडीकर यांनी म्हटले आहे.