विदर्भ साहित्य संघाचा उपक्रम
(Nagpur)नागपूर, 30 जानेवारी
विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित ना. के. बेहेरे स्मृती विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत रायसोनी महाविद्यालयाच्या ओम ढोक प्रथम क्रमांक पटकावला. जी.एस. कॉलेजची प्रिया मिश्रा हिने दुसरे, तर रामदेवबाबा कॉलेजच्या प्रतीक रंजनने तिसरे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेचा बेहरे स्मृती फिरता चषक रायसोनी महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला.
मंगळवारी वि.सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, डॉ. राजेंद्र नाईकवाडे, प्रा. विवेक अलोणी यांच्या हस्ते पुरस्कार, प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. उत्तेजनार्थ गटात होमिओपॅथिक महाविद्यालयाचा वेदांत भोयर तर एल.ए.डी. कॉलेजची अभिलाषा बांद्रे यांना सन्मानित करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘भारत महासत्ता होणार स्वप्न आणि सत्य’ व ‘डिजिटल तंत्रज्ञान वरदान आणि शाप’ हे दोन विषय निर्धारित करण्यात आले होते. यात 16 महाविद्यालयांचे 24 स्पर्धक सहभागी झाले. श्रद्धा भारद्वाज, डॉ. प्रांजली काळे व डॉ. आनंद सहस्रबुद्धे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार मंदार मोरोणे यांच्या हस्ते झाले. प्रदीप दाते यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना वि. सा. संघाचे व्यासपीठ नवकवी, नवसाहित्यिकांसाठी कायम उपलब्ध असल्याचे सांगितले. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी, युवक चिंतनाला चालना मिळावी या हेतूने ही स्पर्धा तीनही भाषांमध्ये स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले. डॉ. प्रांजली काळे यांनी, अशा आयोजनांमध्ये सहभागी झाल्याने इतरांपेक्षा निराळा विचार व आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी या व्यासपीठांवरून मिळते, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. विवेक अलोणी यांनी, तर संचालन व आभारप्रदर्शन वृषाली देशपांडे यांनी केले. याप्रसंगी अंमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सना पंडित, धनश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.















