तबला वादनाने श्रोते भारावले

0

पं. गोपाळराव वाडेगावकर स्मृती द्विदिवसीय संगीत समारोहाला प्रारंभ

नागपूर (nagpur), 20 सप्टेंबर
शास्‍त्रीय, उपशास्त्रीय, सिनेसंगीत, पाश्‍चात्‍य संगीत प्रकारातील तालवाद्यावर जबरदस्‍त पकड असलेल्‍या ओजस अढिया यांनी आपल्‍या एकल तबलावादनाने मोठ्या संख्‍येने जमलेल्‍या रसिकांना मंत्रमुग्‍ध केले.

पं. गोपाळराव वाडेगावकर शिष्य परिवार, खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव सम‍िती, सप्‍तक आणि दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशन द्वारे कै. पं. गोपाळराव वाडेगावकर स्मृतीप्रीत्‍यर्थ आयोजित दोन दिवसीय संगीत समारोहाला शुक्रवारी प्रारंभ झाला. दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशनच्या प्लॅटिनम जुबिली हॉल मध्‍ये आकाशवणीचे निवृत्‍त केंद्र निदेशक दिगंबर पिंपळघरे, दक्षिण मध्‍य सांस्‍कृतिक केंद्राचे माजी संचालक दीपक खिरवडकर, भक्‍ती वाडेगावकर यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्‍छा दिल्‍या.

पं. गोपाळराव वाडेगावकर यांच्‍या शिष्यांच्‍या सूर-ताल संसदने समारोहाची सुरुवात झाली. गायक रितेश तानेलवार व डॉ. मुकुंद ओक, संवादिनीवर विभास गहाणकर, व्‍हायोलिनवर सुमंत गहाणकर, सतारवर डॉ. श्रीराम काणे व शुभदा देशपांडे व तबल्‍यावर असलेल्‍या विरथ वाडेगावकर व डॉ. देवेंद्र यादव यांनी ताल आणि सुरांची मैफल सादर केली. ‘पायलिया झनकाएं मोरी’ च्‍या सुरावटींनी सभागृहात मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित रसिकांना आनंद दिला. त्‍यानंतर दुस-या सत्रात ओजस अढिया यांनी ताल तीन तालने आपल्‍या वादनाला सुरुवात केली. तबल्‍यावर लिलया थिरकणारी त्‍यांची बोटे आणि त्‍यातून उद्भवलेल्‍या सुमधूर नादाने श्रोते भारावून गेले. त्‍यांना श्रीकांत पिसे यांनी समर्पक लहरा संगत केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीराम काणे व गजानन रानडे यांनी केले. डॉ. काणे यांनी पं. गोपाळराव वाडेगावकर यांना श्रद्धांजली वाहिली व त्‍यांच्‍याबद्दलच्‍या आठवणींना उजाळा तर दिगंबर पिंपळघरे यांनी शुभेच्‍छा दिल्‍या. विरथ वाडेगावकर यांनी सर्वांचे आभार मानले.