

अमरावती(Amravati), 12 जुलै :- आदिवासी क्षेत्रात बालविकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अंगांवड्यामध्ये सध्या पाकिटबंद खिचडीचा पुरवठाकंत्राटदारामार्फत पुरविल्या जात आहे. परंतु सदर माल हा निकृष्ट दर्जाचे असून पाकिटबंद खिचडीत चक्क अळ्या निघाल्याचा प्रकार चिखलदरा शहरातील एका अंगणवाडी केंद्रात पहावयास मिळाला आहे. त्यामुळे बालविकास विभागच चिमुकल्याच्या जीवावर उठला की काय? असा प्रश्न पालकांना पडला आहे.
अंगणवाडी केंद्रात 0 ते 6 वर्षाखालील मुलांना सकस आहार बालविकास विभागामार्फत पुरविल्या जातो. चिमुकल्याची संपूर्ण आरोग्याची व आहाराची काळजी तसेच बालकांचा सर्वांगीण विकास या अंगणवाडी केंद्रामार्फत घेतल्या जातो. पण याच अंगणवाडी कें द्रात चिमुकल्याना पुरविल्या जाणारा आहार हा निकृष्ठ दर्जाचे येत असेल तर बालविकास विभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण होतो.
आधी मुलांना अंगणवाडी केंद्रातच आहार शिजवून मुलांना ताजी खिचडी खावयास मिळत होती. पण आता शासनाने पाकिटबंद खिचडीचा कंत्राटदारामार्फत पुरवठा सुरू केलेला आहे. यात चना, साखर, मसूर, हळद, मिरची गहू आणि मीठ समावेश आहे. ही पाकिटबंद खिचडी एकदम निकृष्ठ दर्जाची असून यात अळ्या निघाल्याचा प्रकार चिखलदरा येथील एका अंगणवाडी केंद्रामध्ये पहावयास मिळाला आहे. याकडे बालविकास विभाग हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत तर नाही ना ? असा प्रश्न सुद्धा येथील पालकांनी उपस्थित केला आहे.
खिचडीत अळ्या निघाल्याने परत आम्ही मुलांना दररोज अंगणवाडी केंद्रामध्ये पाठवितो. आधी दररोज अंगणवाडी केंद्रामध्ये खिचडी शिजवून मिळायची. पण आता सर्वच धान्य पाकिटबंद येत असल्याने वाटप करण्यात आलेल्या खिचडीत चक्क अळ्या निघाल्या. त्यामुळे आम्ही ती खिचडीचे पाकीट अंगणवाडी सेविकालापरत केली, असे सिदरा परवीन शेख मोहसीन व मुनज्जा फातेमा सैयद मोहसिन अली यांनी सांगितले.
….तर कंत्राटदारावर कार्यवाही
सदर प्रकाराबाबत बालविकास अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, तो माल तसाच राहू द्या. त्याला लॅब मध्ये पाठवितो व निकृष्ठ दर्जाचे अहवाल आल्यास संबंधित पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कार्यवाही करतो, असे चिखलदराचे प्रभारी महिला व बालविकास अधिकारी नवनाथ धनतोडे यांनी सांगितले.