

अमरावती (Amravti), 10 नोव्हेंबर
ज्यांना सरकारी पेन्शनचा लाभ मिळतो, अशा प्रत्येकाला दरवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत पेन्शन जमा करणाऱ्या बँकेत जाऊन हयातीचा दाखला द्यावा लागतो. यासाठी आता टपाल खात्याने घरपोच जीवन प्रमाणपत्र (डिजिटल जीवन प्रमाणपत्र / हयातीचा दाखला) सुविधा सुरू केली आहे.हयातीचा दाखला म्हणजेच पेन्शन घेणारी व्यक्ती जिवंत आहे, याचा हा पुरावा असतो. हा दाखला बँकेत सादर केला नाही, तर बँक पेन्शनधारक व्यक्ती मृत पावली आहे, असे समजून पेन्शन जमा करणे बंद करू शकते. त्यामुळे हा दाखला वेळेत बँकेत सादर करणे अत्यावश्यक आहे. परंतु, हा दाखला मिळविण्यासाठी पेन्शनधारकांना बँकेत वारंवार चकरा – माराव्या लागतात.
विशेषतः वयोवृद्ध, अपंग पेन्शनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय ग्रामीण भागातील पेन्शनधारकांना, तर याबाबत फारशी काही माहितीही नसते. त्यामुळे हा दाखला मिळविताना अनेकांची मोठी अडचण होते.ही अडचण लक्षात घेऊन टपाल विभागाने पोस्ट पेमेंट बँकेमार्फत आता ही घरपोच दाखल्याची सुविधा सुरू केली आहे.
त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पेन्शनधारकांसाठी हामोठा दिलासा ठरणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शन त्यांच्या पोस्टमन किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतात याशिवाय ‘पोस्ट इन्फो’ हे अॅप डाऊनलोड करून त्यामध्ये ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ हा पर्याय वापरून त्यांच जीवन प्रमाणपत्रासाठीची विनंती नोंदव शकतात. या विनंतीप्रमाणे पोस्टमनन पेन्शनरच्या घरी येऊन आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे जीवन प्रमाणपत्र जारी करेल. विशेष म्हणजे, हा लाभ मिळविण्यासाठी पेन्शनर पोस्ट ऑफिसचा ग्राहक असायलाच हवा, असे कुठलेही बंधन नाही. त्यामुळे कुठलाही पेन्शनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहे.
हा लाभ मिळविण्यासाठी पेन्शन- धारकाकडे पेन्शनचा प्रकार (उदा. सर्व्हिस पेन्शन, फॅमिली पेन्शन आदी.), पेन्शनचा विभाग, पेन्शन मिळणाऱ्या बँक/पोस्ट ऑफिसचे नाव, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) क्रमांक, पेन्शन ज्या बैंक / पोस्ट ऑफिस खात्यात जमा होते तो खाते क्रमांक, स्वतःचा मोबाइल नंबर आणि आधार क्रमांक याची माहिती असणे आवश्यक आहे.