

अमरावती (Amravti), 19 जुलै
वीज तार चोरणार्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्यात घेतले असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत चौकशी सुरू केली आहे.(Theft of Electricity)
दर्यापूर शहरातील साईनगरातील रहिवासी संतोष आसोले यांनी २ जुलैला येवदा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या माहितीनुसार, करतखेड शिवारात प्रवीण खेडकर यांच्या शेतातील रोहित्रा अंतर्गत येणारे एकूण २५ विद्युत खांब खाली पाडून त्यावरील अल्युमिनियमची तार चोरून नेण्यात आली होती. या तारेची किंमत ४३ हजार १७५ रुपये आहे. येवदा पोलिस या घटनेचा तपास करीत असतानाच पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुद्धा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक तपासाला लागले असता अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथील भारत श्रीकृष्ण सूर्यवंशी याने त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन ही चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने भारत सूर्यवंशी याला अमरावतीच्या ट्रान्सपोर्ट नगरातून ताब्यात घेतले. त्याने त्याचा भाऊ लखन श्रीकृष्ण सूर्यवंशी व त्याचे साथीदार प्रकाश मारुती इंगळे रा . बोरगाव वैराळे, मोहंमद सलीम मोहंमद हमीद रा . ताजनगर चौक अमरावती व सागर नेमाडे रा . दर्यापूर यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. अमरावतीच्या मोहंमद सलीम मोहंमद हमीद याच्या भंगार दुकानात हा माल दिला असल्याचेही सांगितले. यापूर्वी दर्यापूर, खल्लार , अचलपूर परिसरामध्ये अशा प्रकारच्या चोर्या केल्याचे सांगितले व चोरीतील काही माल मुज्जू उर्फ मुजम्मील सैयद जहागीर रा . कमेला ग्राउंड अमरावती याला सुद्धा विकल्याचे सांगितले. पोलिसांनी या सर्व आरोपींपैकी श्रीकृष्ण सूर्यवंशी, प्रकाश इंगळे व मोहम्मद सलीम मो. हमीद या तिघांना अटक केली आहे.