काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मिडीयावरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिष्टमंडळासह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मंगळवारी याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पथकाने सागर बर्वे नावाच्या तरुणाला अटक केली होती. सागर बर्वे याने शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले होते. यावेळी आणखी एका पोस्टसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) नावाच्या तरुणाविरोधातही तक्रार केल्याची माहिती समोर आली होती.
सुप्रिया सुळे यांनी ते ट्विट माझ्या नावाने दाखवलं. माझ्यावर आरोप केले. मी सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार आहे.मी जे ट्विट केलं होते, त्यामध्ये औरंगजेब हा सुपारी कतरण खात होता, त्याचं तोंड वाकडं होऊन गेला, त्याची इतिहासात पुनरावृत्ती होणार, असे म्हटले होते. त्यात शरद पवार यांचे कुठेही नाव नव्हतं. त्यांनी माझ्यासोबत माझ्या पक्षालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा माझ्या परिवाराला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सुप्रिया सुळेयांनी माझ्याआई-वडिलांची तसेच पक्षाची माफी मागावी, अशी मागणी पिंपळकरने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी एका फेसबुक पेजवरुन देण्यात आली होती. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांना भेटून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. या धमकी प्रकरणात पुणे शहरातून सागर बर्वे (३४) याला अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी अमरावती येथील भाजप कार्यकर्ता सौरभ पिंपळकर याचेही नाव आले होते. अखेर ७ दिवसांनंतर सौरभ पिंपळकर समोर आला आहे.
















