
मुंबई: राज्यनिवडणूक आयोगाच्या वतीने 5 जुलै 2023 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नसल्याचे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहे. आयुक्त युपीएस मदान यांनी सांगितले की, ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे चे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार होत नाहीत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या जशाच्या तशा घेवून त्या केवळ प्रभागनिहाय विभाजित केल्या जातात, असे स्पष्ट करून मदान म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सर्वच सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याकरिता एक विशिष्ट तारीख निश्चित केली जाते. त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी 1 जुलै 2023 ही कट ऑफ डेट निश्चित करण्याबाबतची अधिसूचना 5 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिलेय.
राज्यात 23 महानगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. तसेच 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. राज्यातील 92 नगर परिषदांमधील ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा प्रलंबित आहे.