

(Nashik)नाशिक : अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने भाजपने आता उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. या सोहळ्यासाठी देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले असून या यादीत उद्धव ठाकरे यांचा समावेश नसल्यामुळेच त्यांना राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बोलावण्यात आलेले नाही, असे भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी (Senior BJP Leader Girish Mahajan) आज स्पष्ट केले.
“राममंदिराच्या उभारणीत किंवा कारसेवा अशा दोन्ही गोष्टींमध्ये उद्धव ठाकरे यांचे कुठलेही योगदान नाही. त्यामुळेच सरकारने त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण दिलेले नसावे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही”, असेही ते म्हणाले. गिरीश महाजन म्हणाले की, आपण स्वतः राम मंदिर आंदोलनाचे साक्षीदार आहोत व दोनवेळा कारसेवेत सहभागी होतो. २० दिवस कारागृहात होतो. उद्धव ठाकरे हे तेव्हा घरात बसले होते. ते कधीही अयोध्येत आले नाहीत. त्यांचा राम मंदिर आंदोलनाशी काहीही संबंध नाही, हे संपूर्ण जगाला माहिती आहे. केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत राज ठाकरे असतील (Raj Thackeray) असतील, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे हे राम मंदिरावरुन टीका करतात. त्यामुळे त्यांना बोलावण्याचे कारण काय?, असा सवालही त्यांनी केला. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहे. संजय राऊतांनी, उद्धव ठाकरेंनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा, असे आव्हानही महाजन यांनी दिले.