
नागपूर(Nagpur), १० जुलै :- धरमपेठ येथील प्रसिध्द ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार(Dr. Srikanth Jichkar) ट्राफिक चिल्ड्रन पार्क येथे नामांकित सामाजिक संस्था जनआक्रोश यांच्या सहकार्याने मिनी बस, व्हॅन व शाळा, महाविद्यालयाच्या बस चालक यांना वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालविण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे. याकरीता नागपूर महानगरपालिकेतर्फे(NMC) जनआक्रोश संस्थेला ट्राफिक चिल्ड्रन पार्कमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी(Dr. Abhijeet Chaudhary) यांनी बुधवारी (10 जुलै) ट्राफिक चिल्ड्रन पार्कची पाहणी केली. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, युवक, महिलांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे प्रशिक्षण देण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.
याप्रसंगी उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त प्रकाश वराडे, उघान अधीक्षक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता (विघुत) राजेंद्र राठोड, विजय गुरूबक्षानी, उपअभियंता नवघरे, माकोडे व जनआक्रोश संस्थेचे संस्थापक सचिव रविंद्र कासखेडीकर उपस्थित होते.
श्री. कासखेडीकर यांनी सांगितले की, रविवार 14 जुलै पासून वाहन चालकांना प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. हे प्रशिक्षण नि:शुल्क दिले जाणार आहे. यासाठी ट्राफिक चिल्ड्रन पार्कमध्ये जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मनपा आयुक्तांचे आभार मानले. विविध शासकीय विभागातून सेवानिवृत्त अधिकारी येथे प्रशिक्षण देणार आहेत.
याप्रसंगी मनपा आयुक्तांनी सांगितले की, जनआक्रोश संस्थेला नि:शुल्क प्रशिक्षण देण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यांनी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ट्राफिक चिल्ड्रन पार्क येथे विविध शाळांच्या मुलांना वाहतूक नियमांबद्दल माहिती देण्याकरीता सहल आयोजित करण्याचे आवाहन केले. तसेच विविध महाविद्यालयातील युवकांना सुध्दा येथे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, रस्त्यावर वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पालन करणे गरजेचे आहे. यासाठी ट्राफिक चिल्ड्रन पार्क योग्य दिशा देऊ शकेल. त्यांनी मनपा अधिका-यांना वाहतुकी नियमाबद्दलचे सायनेज लावण्याचे निर्देश दिले. ट्राफिक पार्कमधील ट्राफिक सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग व्यवस्थीत करण्याचे निर्देश दिले. पार्कमध्ये मुलांसाठी खेळणी सुव्यवस्थित ठेवणे, प्रसाधनगृहांची स्वच्छता राखणे, कच-याची वेळोवेळी विल्हेवाट लावण्याचे सुध्दा निर्देश दिले. तसेच बंद पडलेल्या कारंजा पुन्हा सुरू करण्याचेही निर्देश दिले.
याप्रसंगी जनआक्रोश संस्थेचे अनिल जोशी, विश्वनाथ पांडे, संजय डबली, शाम पोहाणे, रमेश लोखंडे, गिरीश देशपांडे, विवेक अमीन, आर.बी. पाहुणे, साधना पत्की, प्रशांत धर्माधिकारी, राजा अग्रवाल उपस्थित होते.
















