

नागपूर(Nagpur), ११ जुलै :- नागपूर शहरातील वायू प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा संदर्भात नागरी स्तरावरील समितीची बैठक आज गुरुवारी (ता. ११) पार पडली. याअनुषंगाने प्रदूषण कमी करून वायू गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीमधून नवीन कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी(Dr. Abhijeet Chaudhary) यांनी दिले.
वायू गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने सीएसआयआर-नीरी, व्हीएनआयटी तसेच अन्य संस्थांच्या मार्गदर्शनात त्यांच्याकडून प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने मनपाद्वारे कार्य सुरू आहेत. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मनपाद्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा मनपा आयुक्तांनी आढावा घेतला. त्यांनी उद्यान विभाग, लोककर्म विभाग, परिवहन विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग व इतर सर्व विभागांना नविन प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश दिले.
मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात झालेल्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, ‘नीरी’ च्या प्रिसिंपल सायंटिस्ट संगीता गोयल, व्हीएनआयटीचे डॉ. दिलीप लटाये, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, परिवहन प्रशासकीय अधिकारी श्री. रवींद्र पागे, तहसीलदार श्रीमती स्नेहलता पाटील, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सल्लागार डॉ. संदीप नारनवरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री. राजेंद्र पाटील, प्रमोद लोणे, यांत्रिकी अभियंता श्री. सतीश गुरनुले, कार्यकारी अभियंता अल्पना पाटने, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, अजय पझारे, नरेश शिंगणजोडे, सार्वजनिक आरोग्य अभियंता श्री. संदीप लोखंडे, प्रकल्प अधिकारी श्री. राऊत, श्री. गभने आदी उपस्थित होते.
वायू गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे(NMC) विविध कामांचे कार्यादेश प्रदान करण्यात आलेले आहेत. तर अनेक कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. या सर्व कामांकडे प्राधान्याने लक्ष देउन तातडीने पूर्णत्वास नेण्यासंदर्भात आयुक्तांनी निर्देश दिले. मनपाच्या परिवहन सेवेमध्ये १४४ नवीन ई-बसेसचा समावेश करण्यात आला आहे. वाडी, हिंगणा आणि लकडगंज येथील चार्जिंग स्टेशन आणि बस डेपोचे काम पूर्ण झाले आहे. वाठोडा बस डेपोचे काम सुरू आहे. शहरात हरीत क्षेत्राच्या विकासासाठी उद्यान विभागाद्वारे विविध कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. यातील भारत माता उद्यानामध्ये हरीत क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. याशिवाय एसबीआय कॉलनी, इंदोरा, पाटणकर चौक या भागांमध्ये हरीत क्षेत्र विकसित करण्याचे कार्य सुरू आहे. उद्यान विभागाशी संबंधित सर्व कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याबाबत आयुक्तांनी बैठकीत निर्देश दिले.
गंगाबाई घाट, मोक्षधाम घाट आणि मानेवाडा या दहन घाटांवर वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली लावण्यात येणार आहे. जयताळा आणि फ्रेन्ड्स कॉलनी येथील दहनघाट विकसीत करण्याचे काम पूर्ण झाले असून चिंचभुवन दहनघाटाचे कार्य जवळजवळ प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रकल्प विभागाद्वारे सादर करण्यात आली.