नितीन गडकरींची बदनामी हे तेल माफीयांचे षडयंत्र! किशोर तिवारी यांचा दावा

0

भारताच्या इथेनॉल बाजारपेठेत ०.६% पेक्षा कमी वाटा असूनही निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांची बदनामी केली जात आहे. हा सर्व प्रकार सुनियोजीत पध्दतीने केला जात असून, परदेशीय तेल लॉबी आणि भारतातील राजकीय प्रतिस्पर्धी याला जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांचा इथेनॉल व्यवसाय भारताच्या एकूण इथेनॉल उत्पादनात ०.६% पेक्षा कमी वाटा देतो. ते टॉप २० उत्पादकांमध्येही नाहीत. त्यांच्या कंपन्या विविध उद्योग करीत आहेत ज्यांच्या एकत्रित महसुलात इथेनॉलचा वाटा फक्त ५-१०% आहे. गेल्या ४० वर्षांपासून भारताच्या हरित इंधन क्रांतीवर उघडपणे चर्चा करणारे नितीन गडकरी हे या ध्रुवीकृत वातावरणात देशाच्या ऊर्जा भविष्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या मक्तेदारांचे कट उघड करीत आहेत. या सुव्यवस्थित वादाचे सत्य बघीतले असता हा कॉर्पोरेट घोटाळा नसून भारताच्या इथेनॉल क्रांतीला बदनाम करण्यासाठी हताश असलेल्या पश्चिमेकडील तेल माफियांनी चालवलेली तीव्र मोहीम असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांचे जागतिक पेट्रो-डॉलर वर्चस्व धोक्यात येणार आहे हे गंभीर सत्य किशोर तिवारी यांनी उघड केले आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भारत सरकारने २०२५ पर्यंत २०% इथेनॉल मिश्रण (E20) बाजारात आणण्याचे लक्ष्य ठेवले होते. यासाठी इथेनॉल उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ आवश्यक आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी, साखर कारखाने, कृषी उद्योग आणि खाजगी कंपन्यांना इथेनॉल उत्पादनात विविधता आणण्यास प्रोत्साहित करण्यात आले होते व देशभरातील शेकडो कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. यापैकी, सायन अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज (निखिल गडकरी यांच्याशी जोडलेले) आणि मानस अ‍ॅग्रो (सारंग गडकरी यांच्याशी जोडलेले) या अतिशय लहान कंपन्या आहेत, ज्या राष्ट्रीय इथेनॉल उत्पादनात ०.६% पेक्षा कमी योगदान देतात. सायन आणि मानस एकत्रितपणे भारताच्या इथेनॉल उत्पादनात एक अंश योगदान देतात परंतु नितीन गडकरी यांची १००% बदनामी केली जात आहे. इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि प्रमुख साखर गटांसारख्या मोठ्या कंपन्या या क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहेत. टीकाकारांचा दावा आहे की सायन अ‍ॅग्रोचा जून २०२५ चा महसूल जून २०२४ च्या तुलनेत “फुगलेला” आहे परंतु सत्य हे आहे की त्यांच्या उपकंपन्या सप्टेंबर २०२४ मध्ये अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. स्वाभाविकच, जून २०२५ च्या एकत्रित निकालांमध्ये त्या अधिग्रहणांचा समावेश आहे, तर जून २०२४ च्या निकालांमध्ये नाही. कोणताही लेखापाल पुष्टी करेल की हे मानक एकत्रीकरण झाले आहे असे धक्कादायक सत्य आज किशोर तिवारी यांनी जगासमोर ठेवले आहे.

तेल माफियांचे षडयंत्र

गडकरींचे पुत्र या क्षेत्रातील अगदी लहान खेळाडू असतांना बदनामी केली जात आहे. याचे उत्तर त्यांच्या व्यवसायात नाही तर त्यांच्या वडिलांच्या राजकारणात आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) गेल्या ४० वर्षांपासून भारतात इथेनॉलचे सर्वात जास्त समर्थक आहेत. त्यांनी सातत्याने जागतिक तेल एकाधिकाराचा विरोध केला आहे. स्वत स्वच्छ पर्याय, ग्रामीण भारताचे सक्षमीकरण आणि स्वावलंबी भारताचा पुरस्कार केला आहे. इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देऊन, त्यांनी थेट पाश्चात्य तेल माफियांना आव्हान दिले आहे. ही टोळी भारतातील मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या आयातीवर भरभराटीला येते, ज्याभोवती अनेक दशकांपासून जागतिक अर्थ व्यवस्था तेलाच्या आसपास फिरत आहे. पेट्रो-डॉलर प्रणाली ऊर्जा व्यापारात पाश्चात्य वर्चस्व सुनिश्चित करते. जर भारतात इथेनॉलचा विस्तार केला गेला तर हे एकाधिकार कमी होईल . इथेनॉल मिश्रणात प्रत्येक १% वाढ तेल आयातीतून ६ अब्जावरं डॉलर्सची बचत करते. याला २०% ने गुणा, आणि तुम्हाला समजेल की जागतिक तेल लॉबी या निर्णयाबद्दल इतकी चिंताग्रस्त का आहे, असेही तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.

राजकीय बदनामी थांबवा

पाश्चिमात्य तेल माफियांना माहिती आहे की इथेनॉल त्यांच्या नफ्यासाठी धोका आहे. जर भारताने २०% मिश्रण मिळवले तर भारत दरवर्षी सुमारे ६ अब्ज डॉलर्स परकीय चलन वाचवेल आणि कृषी उत्पादनांसाठी एक नवीन, स्थिर बाजारपेठ मिळवेल. निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांना कोणत्याही नागरिकाप्रमाणे व्यवसाय चालवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांचे कामकाज इतरांसारखेच कायदे, ऑडिट आणि खुलासे यांच्या अधीन आहे. फक्त इथेनॉल क्षेत्रात असल्याने त्यांची बदनामी करणे न्याय नाही तर पूर्वग्रह आहे. जर त्यांच्या व्यवसायांचा राष्ट्रीय वाटा ५०% असता तर चौकशी समजण्यासारखी असती. परंतु ०.६% पेक्षा कमी असल्यास, हा आरोप हास्यास्पद बिनबुडाचा आहे. नितीन गडकरी हे स्पष्ट आणि सरळ विचारसरणीचे माणूस आहेत. मी त्यांना १९७४ पासून ओळखतो आणि माझा विवेक मला हे सत्य पुन्हा पुन्हा बोलण्यास भाग पाडत आहे. त्यांनी एकदा भारताचे नेतृत्व करावे ही किशोर तिवारी यांची इच्छा आहे मात्र त्यामुळे अशा प्रकारे त्यांचे अनियंत्रित चारित्र्य हनन होत असेल तर नितीन गडकरी अशावेळी या पंतप्रधान पदालाही लाथ मारतील असा विश्वास तिवारी यांनी व्यक्त करीत राजकीय बदनामी थांबविण्याचे आवाहन केले आहे.