नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ

0

छत्रपतीच्या गडकिल्ल्यांचा वारसा जपणारा अनोखा उपक्रम

शिवगर्जनांनी सेवासदन शिक्षण संस्थेचा परिसर दुमदुमला

नागपूर, ऑक्टोबर २०२५ :आपला इतिहास, संस्कृती आणि परंपरा हीच आपली खरी प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, नेतृत्व आणि कर्तृत्व हे भविष्यातल्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. लहान मुलांमध्ये हे मूल्य रुजावे आणि प्रत्येक घरातून शिवाजी महाराजांचा आदर्श पोहोचावा, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री मा. श्री. गडकरी यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा, शौर्यगौरव आणि सांस्कृतिक परंपरांना उजाळा मिळावा, या उद्देशाने खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूर यांच्या वतीने प्रथमच ‘शिववैभव किल्ले स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी सेवासदन शिक्षण संस्थेत शनिवारी केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते पार पडले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, प. पू. धर्मभास्कर सद्गुरूदास महाराज, राजे मुधोजी भोसले, सेवासदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कांचनताई गडकरी, उपाध्यक्षा वासंती भागवत यांच्‍यासह मंचावर खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, दयाशंकर तिवारी, सुधाकर कोहळे, जयप्रकाश गुप्‍ता अतुल गुरु, रमेश सातपुते यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत एकूण १५० किल्ल्यांची निर्मिती विद्यार्थ्यांनी व विविध संस्थांनी केली असल्‍याचे सांगत अतुल गुरु यांनी या स्पर्धेची प्रास्‍ताविकातून सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे, दुर्गा वाहिनी या महिलांच्या गटाने किल्ल्यांची सुंदर निर्मिती साकारली असल्‍याचे ते म्‍हणाले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संजय बंगाले यांनी केले. अमर कुळकर्णी यांनी शिवगौरव गीत सादर केले व शेवटी उपस्‍थ‍ितांचे आभार मानले.

……………
हा संस्‍कृतीचा गौरव – मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे
सांस्कृतिक वैभव जपणारे आणि सर्व कलागुणांना संधी देणारे कार्य श्री. नितीन गडकरी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून करीत आहेत. ‘शिवकालीन किल्ले स्पर्धा’ ही आपल्या संस्कृतीचा गौरव करणारी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळणे हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. या उपक्रमातून आपल्या इतिहासाचे, मराठी साम्राज्याचे आणि संस्कृतीच्या गौरवाचे दर्शन घडते,” असे मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

……………
तेजस्‍वी परंपरेला नवी झळाळी – प. पू. धर्मभास्कर सद्गुरूदास महाराज
शिववैभव किल्‍ले स्‍पर्धेच्‍या निमित्‍ताने १५० किल्ल्यांची निर्मिती ही अभिनंदनीय बाब आहे. शिवाजी महाराजांचे जीवन किल्ल्यांशी अखंड जोडलेले होते. किल्‍ल्‍यावरचे ते जन्मले, वाढले, लढले आणि विसावले. किल्ले होते म्‍हणून आपले स्वातंत्र्य अबाधित राहिले. श्री. नितीन गडकरी यांनी या उपक्रमातून शिवाजी महाराजांच्‍या त्या तेजस्वी परंपरेला नवी झळाळी देण्‍याचा प्रयत्न केला आहे,” असे सद्गुरूदास महाराज म्हणाले.
…………….
शिवगर्जनांनी परिसर दुमदुमला
पाहुण्‍यांचे स्‍वागत विद्यार्थ्‍यांनी ढोलताशाच्‍या गजरात केले. मान्‍यवरांनी किल्‍ल्‍यांची पाहणी केली त्‍यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. कार्यक्रमादरम्‍यान, शिवशाही शस्त्र प्रशिक्षण समूहाच्‍या विद्यार्थ्यांनी दांडपट्टा, तलवारबाजी आदी शिवकालीन शस्‍त्रांचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले.