

खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती व संस्कार भारती यांचे आवाहन
नागपूर (Nagpur) :- सामाजिक, आध्यात्मिक महत्त्व असलेल्या स्थानिक गणेशोत्सवाला आता सांस्कृतिक स्वरूपही प्राप्त झाले आहे. मागील दोन वर्षांपासून शहरातील गणेश मंडळे धुमधडाक्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. यावर्षी देखील नागपूरकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार असून स्थानिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूर व संस्कार भारती, नागपूर यांच्या संयुक्तवतीने कला, साहित्य, संस्कृती, परंपरांचा प्रचार व प्रसार व्हावा व गणेशोत्सवात विविध गणेश मंडळांनी कला, साहित्याशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी या उपक्रमात शहरातील वेगवेगळ्या भागातील शेकड़ो गणेशोत्सव मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात कवी संमेलने, विविध सामाजिक, देशभक्ती विषयांवरील नाटक, एकपात्री प्रयोग, राष्ट्रभक्तिपर, सुगम संगीताचे कार्यक्रम, महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ, नृत्य, रांगोळी आदींचा समावेश होता.
यावर्षी गणेशोत्सवात नाट्य संगीत, सुगम संगीत (भावगीत, भक्तिगीत, अभंग, देशभक्तीपर गीत, गीतरामायणावर आधारित निवडक गीते) भजन, कीर्तन, देशभक्तीपर नृत्य, गोंधळ, भारूड, नकला, एकल व समूह नृत्य, समूह वादन, कथाकथन, रांगोळी प्रशिक्षण, पारंपरिक खेळ, एकपात्री प्रयोग, कविसंमेलन (हिंदी व मराठी), लोकनृत्य, जादूचे प्रयोग, जागरण, दृकश्राव्य कार्यक्रम, बँड व ढोलताशा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. एका गणेशोत्सव मंडळाला खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीकडून एकच कार्यक्रम देण्यात येईल. इच्छूक गणेश मंडळांनी त्याकरिता 16 ते 25 ऑगस्ट दरम्यान 100 रुपये शुल्क भरून आपली नोंदणी करावी. त्याकरीता श्री. नितीन गडकरी यांचे संपर्क कार्यालय, सावरकर नगर, ऑरेंज सिटी हॉस्पिटल समोर, खामला चौक, नागपूर येथे किंवा अधिक माहितीकरीता 0712-2239918 या क्रमांकावर सकाळी 11 ते 2 या वेळात संपर्क साधावा.
या उपक्रमाच्या सफलतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव (MP Cultural Festival) आयोजन समिती, नागपूरचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कादिर, संजय गुळकरी, रेणुका देशकर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, किशोर पाटील,मनिषा काशीकर परिश्रम घेत आहेत.