

माननीय,
श्री नितीन गडकरींशी (Nitin Gadkari) माझा प्रत्यक्ष परिचय नाही. मी लष्करात दाखल झालो त्या वेळी ते बहुतेक शाळा कॉलेजचे विद्यार्थी असणार. त्यामुळे, विद्यार्थी दशेतील त्यांच्या कार्यावर टिप्पणी करण्याचा अधिकार मला नाही. पण सुट्टीवर आलो की,जगतमधे चहा किंवा पंचशीलवर गप्पा मारतांना, निवडणुकीच्या वेळी सायकलवरून, आधी जनसंघ आणि नंतर जनता पार्टीच्या उमेदवाराचा सर्व प्रकारचा प्रचार करणाऱ्या एका तडफदार तरुण अवलिया नेत्याच्या कार्याची माहिती मित्रांकडून मिळत असे. असच एकदा सुट्टीवर आलो असतांना त्यांचा विवाह आमच्या मित्राच्या भाचीशी झाल्याच कळल्यावर त्यांच्याप्रती मनात एक अदृष्य, अनामिक पण भावनिक धागा विणल्या गेला. नागपूरचा पहिला उड्डाणपूल बांधणारा कार्यक्षम मंत्री ही त्यांची, १९९५-९६ दरम्यानची पुढली ओळख बातमी. त्यांच्या अपघातानंतर, माझ्या अस्थितज्ञ डॉक्टर मित्रांनी त्यांना ट्रीटमेंट दिल्याच ही मी ऐकल होत. निवृत्त होऊन नागपूरला आल्यावर देखील माझा त्यांच्याशी कधी प्रत्यक्ष संपर्क झाला नाही. पण वेळोवेळी, मतपेटीच्या माध्यमातून त्यांना मत देण आणि २०१९च्या लोकसभेसाठी माझ्या निवृत्त लष्करी मित्रांमधे त्यांचा प्रचार करणे हाच, त्यांच्या व माझ्यामधील म्हणण्यासारखा दुसरा दुवा होता. त्यामुळे ज्यावेळी विदर्भ वतन वृत्तपत्र/ पोर्टलच्या संपादकांनी, नितीन गडकरींच्या वाढदिवस विशेषांकासाठी, गडकरींशी संबंधित आठवण लिहिण्याची फर्माईश केली त्या वेळी, आय वॉज नॉन प्लस्ड.
नितीन गडकरींना लष्कराबद्दल प्रेम आणि आस्था आहे. सेनेतील माझ्या मित्राच्या धडपडीची नोंद घेऊन त्यांनी २०१६मधे, नागालँड मणिपूरला (Nagaland Manipur) जोडणाऱ्या, नॅशनल हायवे २च्या (आधी कुख्यात एनएच ३९) शंभर किलोमीटर सेगमेंट निर्मितीला कशी तातडीनी मंजुरी दिली. याची दन्तकथा आजही त्या भागातील नागरिक व आर्मीत सांगण्यात येते. स्वतः गडकरींना याची कितपत आठवण असेल सांगता येत नाही. युनायटेड नागा कौन्सिलनी हा हायवे अनेकदा ब्लॉक केला आहे. सगळ्यात मोठ ब्लॉकेड ४५ दिवसांच होत ज्याच्या जखमा अजूनही भळभळताहेत. अशा ब्लॉकेडमधे मणिपूरला किती हाल अपेष्टांना तोंड द्याव लागल असेल याची कल्पनाच करता येत नाही. आपल्या अवास्तव मागण्यांच्या मंजुरीसाठी, भारतीय गणराज्यातील एका राज्याचा मागासलेला वर्ग, दुसऱ्या राज्याच्या संपूर्ण जनतेला, वेळोवेळी वेठीवर धरत असे आणि राज्यकर्ते असहाय्य, मूकदर्शक असत. या हायवे शिवाय आसामच्या दक्षिणेतून दोन रस्ते मणिपूरला जातात पण प्रचंड लांबी आणि पुरवठ्याच्या कठीणाईमुळे (लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स) त्यांचा फारसा वापर होत नाही. याच हायवेच्या एका छोट्या भागाच्या निर्मितीसाठी आसाम रायफल्सचे कॅप्टन डीपीके पिल्लईं १९९४ पासून प्रयत्न करत होते.
१९९४च्या पूर्वार्धात, नागा अंडर ग्राउंड मिलिटन्ट (युजीज) मणिपूर नागालँड सीमेवरील एक पूल उडवण्याच्या तयारीत असल्याची खबर मिळाली. सेनेत येऊन केवळ तीन वर्ष झालेल्या आणि अजूनही नीट मिसरूड न फुटलेल्या कॅप्टन पिल्लईंना, त्या आतंकवाद्यांना शोधून नेस्तनाबूत करण्याची जबाबदारी दिल्या गेली. चार दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर तरुण कॅप्टनला हा ग्रुप लॉंगडीपब्रम गावात असल्याची खात्री पटली. अजिबात वेळ न घालवता, कॅप्टन पिल्लईंनी आपल्या प्लाटूनसह आतंकवाद्यांच्या हाईड आऊटवर आकस्मिक हल्ला (क्विक रेड) केला. तीन तासांच्या भयंकर चकमकीत दोन आतंकवादी मारल्या गेलेत, तिघांना कैद केल्या गेल आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक हस्तगत केल्या गेली. पण कप्तान पिल्लईंची छाती आणि मनगटावरील भाग (फॉर आर्म), एके ४७ रायफल्सच्या बर्स्टनी छलनी झाले. युजींच्या ग्रेनेड मुळे त्याच्या पायाची बोट उडाली आणि हातघाईच्या लढ्यात त्यांच्या पाठीचा मणका, आतंकवाद्यांनी केलेल्या रायफल दस्त्याच्या मारामुळे क्रॅक झाला. जखमी पिल्लई हेलिकॉप्टर इव्हॅक्युएशनची वाट बघत असतांना त्यांना, आतंकवादी व आसाम रायफलच्या क्रॉस फायरमधे जखमी दोन लहान मुल दिसलीत. “त्यांना ही नेलत तरच मी जाईन” असा हट्ट कॅप्टननी धरल्यामुळे, तिघांनाही हेलिकॉप्टरद्वारे कलकत्त्याच्या कमांड हॉस्पिटलमधे नेण्यात आल. यथोचित उपचारांमुळे तिघांचेही प्राण वाचलेत.
१९९५मधे कॅप्टन डीपीके पिल्लईंना या चमकीतील वीरतेसाठी शौर्यचक्र प्रदान करण्यात आल.पण ते जन्मासाठी लो मेडिकल कॅटॅगरी (अपंग) झालेत.२०१०मधे निवृत्त झाल्यावर पिल्लईंनी त्या मुलांची खबरबात घेण्यासाठी लॉंगडीपब्रम गावाच्या गाव बुढ्याशी (व्हिलेज हेड :आपल्या येथील सरपंच सदृष व्यक्ती) संपर्क साधला असतां, त्यांना तेथे येण्याच आग्रही निमंत्रण मिळाल. गावातील पटांगणात पिल्लईंच्या घरवापसीचा (रियुनियन) मोठा,हृदयस्पर्शी समारंभ झाला. आर्मीतील माझा एक कार्यरत ज्युनिअर, पिल्लईं बरोबर तेथे गेला होता त्याच्याकडूनच मला ही गोष्ट कळली.लॉंगडीपब्रम गावाची हालत,आधी होती तशीच या वेळीही होती.गावात जाण्यासाठी अजूनही नीट रस्ता नव्हता. पिल्लईंच्या मनाला ही गोष्ट फार लागली.तेथून परत आल्यावर,गावकऱ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पिल्लईंनी त्या गावातून जाणाऱ्या रस्त्यासाठी केंद्र व राज्य सरकारशी पत्र व्यवहार सुरू केला.या रस्त्याच्या सामरिक व प्रशासकीय महत्त्वामुळे,शिलॉंग स्थित आसाम रायफल मुख्यालयानी व राज्य सरकारनी पिल्लईंची बाजू उचलून धरली.
एक निवृत्त,अपंग सैनिक अधिकारी,ज्या जागी जखमी झाला होता तिथल्या गावकऱ्यांना दिलेल्या वचन पूर्तीसाठी प्रशासनाशी झुंज देत होता.त्याच्या या प्रयत्नांना यश येत गेल आणि त्या गावाशी संपर्क साधण सोप व्हाव या उद्देशाने २०१२मधे,तत्कालीन सरकारनी त्या क्षेत्रात २३ किलोमीटर लांब रस्ता बांधायला तात्विक मंजुरी दिली.पण आधी प्रकाशकीय त्रांगड आणि तदनंतर केंद्रात झालेल्या सत्ता पालटामुळे ही मंजुरी प्रत्यक्षात आलीच नाही.पिल्लईंचा पत्रव्यवहार पूर्णतः सफल व्हायची चिन्ह हळूहळू धुमीळ होत होती.पण त्यांनी आपले चिवट प्रयत्न सोडले नाहीत अन हीच वेळ होती ज्या वेळी या गोष्टीत नितीन गडकरींची एंट्री झाली.
शेवटचा उपाय म्हणून पिल्लईंनी, रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे मिनिस्टर श्री नितीन गडकरींना डेमी ऑफिशियल लेटर लिहून या सर्व आपबीतीची कल्पना दिली. गडकरींना या मार्गाच्या सामरिक/ प्रशासकीय महत्वाची खात्री पटल्यामुळे, ऑक्टोबर,२०१६मधे माननीय मंत्री महोदयांनी, केवळ तो रस्ताच नाही तर, तामेनलॉन्ग लॉंगडीपब्रम पेरेन या शंभर किलोमीटरच्या नॅशनल हायवे मंजूर केला. अर्जदाराशी कोणतीही ओळख पाळख किंवा शिफारस नसतांना, नितीन गडकरींनी; कॅप्टन रँकच्या एक निवृत्त सेनाधिकाऱ्याच्या पत्र विंनतीला मान देऊन, केवळ नागालँड मणिपूरच्या नागरिकांनीच नाही तर आसाम रायफल्सच्या जवानांची जिंदगी देखील सुलभ बनवण्यास सक्रिय हातभार लावला. तो रस्ता आता पूर्ण झाल्याच समजत. एका उच्च पदस्थ व्यक्तीच्या, सैनिकांप्रती आदर आणि राष्ट्राप्रती समर्पण भावनेच हे ज्वलंत उदाहरण आहे.
ही कहाणी,नितीन गडकरींच्या संरक्षणदलां प्रती समर्पित भावनेची एक छोटीशी मिसाल आहे. मागील सात वर्षांमधे; ब्रह्मपुत्रेवरील दोन प्रचंड मोठे पूल, अरुणाचल व लडाखमधे सीमेलगत बांधण्यात आलेले रस्ते, नक्षलग्रस्त भागांमधील रस्त्यांचा विकास, इनलॅण्ड वॉटर कम्युनिकेशन प्रोजेक्ट्ची सुरवात, देशाच्या आतील भागात जरूर पडली तर लढाऊ विमानांसाठी वापरात येऊ शकणाऱ्या रनवे सारखी प्रशस्त रस्ते बांधणी, या सारख्या प्रकल्पांमधून त्यांची; सामरिक कल्पकता, कार्यक्षमता, धडाडी आणि देश रक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या दळणवळण साधना प्रतीची दूरदृष्टी आणि सामरिक जाणीव उजागर होते. खर तर मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातच जर ते संरक्षणमंत्री झाले असते तर आज, संरक्षणदल व देशाच वेगळच चित्र दिसल असत. पण त्या वेळच्या केंद्रीय राजकारण पटलावर ते, इतरांच्या तुलनेत जरा अननुभवी व्यक्ती मानल्या गेल्यामुळे त्यांना दळणवळण खात्याची जबाबदारी सोपवल्या गेली असावी. मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात ते संरक्षणमंत्री बनावे ही सर्व कार्यरत व निवृत्त सैनिकांची इच्छा होती. पण काही कारणांमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. वुई वॉन्टेड ए गो गेटर इन डिफेंस, बट फॉर सम रिझन्स दॅट वॉज नॉट टू बी.एनी हाऊ, अवर लॉस इज देअर गेन.
गडकरी एक योध्दयाचा हा तडफदार बाणा, २०२०-२१च्या कोविद १९ कोरोना साथीच्या वेळी नागपूरकरांनी अनुभवला. या बद्दल इतर लेखांमधे सविस्तार चर्चा होईलच पण एक निवृत्त सेनाधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या योगदानाची मिमांसा करण्याचा मी प्रयत्न केला आहे. या साथीत पहिले काही दिवस ते शांतपणे प्रशासनाची तारांबळ पाहता होते. पण ज्या वेळी त्यांच्या लक्षात आल की प्रशासकीय प्रयत्न तोकडे पडताहेत त्यावेळी हा योद्धा रणांगणात उतरला. त्याला आम्ही आर्मीत “लीड फ्रॉम फ्रंट” म्हणतो. आपली दूरदृष्टी, व्यापार कौशल्य, राजकीय वजन आणि कॉर्पोरेट कॉन्टॅक्ट/ओळखीचा पुरेपूर उपयोग करून त्यांनी नागपूरकरांसाठी, कोव्हिशील्ड/कोव्हॅक्सिन लशींचा पहिला पुरवठा करण्याच्या प्रक्रियेला चालना दिली. हहा त्यांचा “बॅटल इनिशिएटिव्ह”होता.
विषाणूंची साथ बळावत असतांना नागपूरच्या वैद्यकीय वर्तुळात प्राणवायूची जबरदस्त कमी भासू लागली. गडकरींनी,डॉक्टर्स आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच संबोधन करून, रुग्णालयांना “नीड बेसिस रेशनिंग”वर ऑक्सिजन सिलिंडर्स वापरण्याकच सल्ला दिला. त्याच बरोबर संरक्षण आणि रेल्वे मंत्र्यांशी सल्ला मसलत करून रेल्वे/वायुदलाच्या विमानांनी ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक सुरु केली. उद्योग मंत्र्यांना सांगून त्यांनी मोठ्या औद्योगिक प्रतिष्ठानांमधे,इतर सर्व काम बाजूला सारून,फक्त प्राणवायू निर्मिती करण्याचे आदेश जारी करवले.नागपूरच्या सर्व कारखान्यां मधेही हेच होईल याची त्यांनी खात्री केली. ही त्यांची “प्रॉपर युटिलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोर्स”ची जाणीव होती.
स्वतःच्या खासदार निधीतून त्यांनी किती रुग्णालयांना; व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन सिलेंडर्स आणि इतर वैद्यकीय साजो सामान दिल याची गणतीच नाही. धरमपेठेतील बंद पडलेल्या नागपूर नागरिक रुग्णालयाचा कायापालट करून इथे कोविद कोरोना सेंटर उभ करण्यात त्यांच मोलाच योगदान हा त्यांच्या शिरपेचातील तुरा होता. हे सर्व त्यांनी लष्करी अचूकता व कौशल्यानी (मिलिटरी प्रिसिजन) केल हे विशेष. त्यांची ही कामगिरी, “डिस्ट्रिब्युशन ऑफ अव्हेलेबल असेट्स” या सदराखाली येते. त्यांच्या कारवाया, लष्करी मनोवृत्तीला उजागर करत असल्यामुळे, या लेखाच शीर्षक,नितीन गडकरी एक योद्धाआहे. ईश्वर या योध्दयास उदंड आयुष्य देवो. जय हिंद.
लेखक
कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)