NEET पेपरफुटीच्या प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा, 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द

0

NEET : देशभरात नीटचा पेपर लीक झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर याप्रकरणी चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी आता देशातील जवळपास 250 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच 2024 साली घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेली नीटच्या (NEET) परीक्षेचा पेपर लीक झाल्याची घटना समोर आली होती. देशातील अनेक भागात नीटचा पेपर लीक झाल्याच्या (NEET UG Paper Leak 2024) घटना समोर आल्यानंतर या प्रकरणी गंभीर दखल घेत राष्ट्रीय वैद्यक परिषदेने व नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने ही याप्रकरणी चौकशी सुरू केली होती. आता याप्रकरणी देशातील जवळपास 250 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रथम वर्ष एमबीबीएससाठी (MBBS) प्रवेश घेतलेल्या 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहे. तर 62 विद्यार्थ्यांना 3 वर्षासाठी नीट परीक्षेतून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे 2024 च्या नीट परीक्षेत देशातील 67 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 मार्क मिळवले होते. यावरून पेपर लीक झाल्याच्या संशयाला पुष्टी मिळते. या सर्व प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेत नुकतीच ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे 2025 ची नीट परीक्षा उद्या दिनांक (4 मे रोजी आहे. यावर्षीच्या नीट परीक्षेच्या एक दिवस आधी ही कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पेपरफुटीच्या प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा

गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 च्या मे महिन्यात परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत पेपरफुटीसह गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 40 पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय चाचणी संस्थेला अर्थात एनटीएला केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एनटीएकडून NEET UG परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आला.

गेल्या नीट परीक्षेचा पेपर झारखंडमधील हजारीबाग शहरात परीक्षेच्या 45 मिनिटं आधी फोडण्यात आला. त्यानंतर या पेपरमधील प्रश्नांची उत्तरं विकण्यात आल्याचा दावा एनटीएने न्यायालयात केला होता. या दाव्याविषयी सर्वोच्च न्यायालयाकडून शंका उपस्थित करण्यात आली होती. फक्त 45 मिनिटांत 180 प्रश्नांची उत्तरं सोडवून ती पेपर विकत घेणाऱ्यांना पुरवण्यात आली. ही उत्तरं पाठ करून विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला, या एनटीएच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.