ठरलं! हरियाणात ‘या’ दिवशी होणार शपथविधी

0

Nayab Singh Saini To Become Haryana CM : हरियाणाच्या नव्या सरकारचा शपथविधी १७ ऑक्टोबरला होणार आहे. नायब सिंह सैनी सकाळी १० वाजता राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

पंचकुलामध्ये हा कार्यक्रम आयोजित होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात  (Prime Minister Narendra Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची माहिती केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा १७ ऑक्टोबर रोजी पंचकुलामध्ये होणार आहे.

शपथविधी सोहळ्याला सुमारे ५० हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या मोठ्या नेतृत्वासह पक्षाचे वरिष्ठ नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल विज, कृष्ण लाल मिधा, श्रुती चौधरी, अरविंद कुमार शर्मा, विपुल गोयल, निखिल मदान यांना हरियाणा सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.

मार्च २०२४ मध्ये नायब सिंह सैनी यांना हरयाणा पक्षाच्या अध्यक्षपदावरून मुख्यमंत्री करण्यात आले. त्यावेळी मनोहर लाल खट्टर यांच्या साडेनऊ वर्षांच्या कार्यकाळानंतर भाजपला विरोधाचा सामना करावा लागत होता.

हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने ४८ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने फक्त ३७ जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत जेजेपी आणि आम आदमी पक्षाला जागा मिळालेल्या नाहीत. राज्यातील तीन जागा अपक्ष आल्या आहेत.

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने ईव्हीएमबाबत आरोप केले आहेत. काही काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी दिल्या आहेत.