
एकवीरा देवी मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडून विशेषतः सीकेपी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते. तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे कुलदैवत आहे. या मंदिर-संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहेत, असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते.
आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर स्वयंभु असुन अतिशय प्राचीन आहे. आईची मुर्ती स्वयंभु तांदळा दगडात प्रगटलेली “शेंदूर चर्चीत” आहे. आईचे नेत्र मिन्यापासून बनवलेले आहेत. आईचे रुप प्रसन्नकारी आहे. एकविरा देवी ही जलदेवता म्हणुन प्रसिध्द आहे. आईच्या डाव्या हाताला आईची नणंद “जोगेश्वरी देवीची“ शेंदूर चर्चीत मुर्ती आहे.
कार्ला निवासीनी शक्तीदायीनी श्री एकविरा आई महाराष्ट्राची आराध्य कुलदैवता, हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा म्हणजेच आदिमाता रेणुका ही परशुरामाची माता होय. परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र किर्ती मिळवली, म्हणुन एका विर पुत्राची आई म्हणंजेच एकविरा माता होय. ‘एकवीरेति विख्याता सर्वकामप्रदायिनी सह्याद्रिखंडता असा उल्लेख सापडतो कि शंकरानेच आईला एकविरा हे नाव देऊन ठेवले आहे.
या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपुर आहेत आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. बकरी/ कोंबडी यांसह इतरही काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत, अशी भाविकांची मान्यता आहे.
पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वरही तिने पांडवांना दिला. एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.
तथापि, कार्बन डेटिंगनुसार असे आढळते की, या मंदिराची बांधणी दोन कालखंडांमध्ये झाली आहे – इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत आणि ५व्या शतकापासून ते १०व्या शतकापर्यंत.
सदर मंदिर डोंगरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. एकवीरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्त्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. मुख्य देवता एकवीरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहेत. टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे.
कार्ला लोणावळ्यापासून ८ किमी. अंतरावर आहे. लोणावळ्यापासून ते एकवीरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर करता येतो. तसेच, ऑटो रिक्षादेखील उपलब्ध आहेत. पुणे शहरा पासून ४९ कि.मी. मुंबईपासून ९७ कि.मी आहे. पुणे लोणावळा मार्गावीर लोणावळ्याच्या अलीकडील मळवली रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे. पुणे ते लोणावळा अशी लोकल रेल्वेची सेवा आहे.
संकलन – सुधीर लिमये पेण