नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध – सर्वोच्च न्यायालय

0

नवी दिल्ली (New Delhi), ४ एप्रिल : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने उपरोक्त निकाल दिला.

मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून २०२१ रोजी राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यांना न्यायालयाने दोन लाख रुपयांचा आर्थिक दंड देखील ठोठावला होता. त्या निर्णयाला राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनिल भालेराव या नेत्यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणाऱ्या याचिका २०१७ मध्ये दाखल केल्या होत्या. राणा यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. जात प्रमाणपत्र समितीसमोरही त्यांनी खोटा जातीचा दाखला दिलेला आहे, असा आरोप या याचिकांच्या माध्यमातून करण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच, बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोन्ही गटाचा युक्तीवाद २८ फेब्रुवारीला पूर्ण झाला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला. आज या प्रकरणी अंतिम निकाल जाहीर केला.