

: डॉ. संजय नाथे यांचे प्रतिपादन
: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त
मराठी भाषा : रोजगाराच्या संधी या विषयावर व्याख्यान
: मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय आणि विदर्भ साहित्य संघाचे आयोजन
नागपूर(NAGPUR):२७ जानेवारी
भाषा रोजगार हा विषयच सर्जनशीलतेचा आहे. सर्जनशील मनुष्य घडविण्यात मातृभाषेचा मोठा हात असतो. मातृभाषेतूनच नैसर्गिक कौशल्ये विकसित होतात, असे प्रतिपादन नाथे प्रकाशनाचे संचालक डॉ. संजय नाथे यांनी येथे केले. मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा : ३६ जिल्हे ३६ मार्गदर्शन सत्रे या उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. मराठी भाषा : रोजगाराच्या संधी हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी भूषविले. याप्रसंगी मंचावर भाषा संचालनालयाच्या अनुवादक स्नेहल फुणसे यांची उपस्थिती होती. डॉ. संजय नाथे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनांतर्गत १८ लाख कर्मचाऱ्यांची पदे शासकीय पातळीवर उपलब्ध असल्याने मराठी भाषिकांसाठी भरपूर संरक्षण व रोजगाराच्या संधी आहेत. त्यासाठी व्यवस्थित योजना आखून पुढे जावे. व्यवसायाच्या बाबतीत बोलताना त्यांनी फोर्ड कार कंपनीचे सर्वेसर्वा हेन्री फोर्ड यांचे उदाहरण सांगितले.
मातृभाषेतूनच संवाद साधल्याने व्यवसायात स्नेहभाव वाढतो, परिणामी व्यवसाय वृध्दिंगत होतो. आज इंग्रजीचे प्राबल्य वाढल्याने मुले मोठ्या संख्येने इंग्लिश मिडियममध्ये शिकत आहे व दुर्दैवाने केवळ एक चाकोरीबद्ध पिढीच निर्माण होत आहे. शिक्षण, पोलिस, ग्रंथालय विभाग यात मराठी भाषिकांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. त्यासाठी मेंदू कुजवणाऱ्या मोबाईलचे वेड सोडून बुद्धी फुलवणाऱ्या अवांतर वाचनाची सवय लावावी. वाचनाचा प्रचंड फायदा स्पर्धा परीक्षेत होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्र शासनाने भिलार या पुस्तकाच्या गावासारखे उपक्रम ठिकठिकाणी राबवावे. ग्राम तिथे ग्रंथालय चळवळ उभारावी, जेणेकरून ग्रामीण विद्यार्थी गावातच अभ्यास करेल व त्या ग्रंथालयाच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. लाडकी बहीण योजनेसारखे मराठी भाषा संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहनही नाथे यांनी शासनाला केले.
अनेक पर्यायी शब्द असलेल्या मराठीतच संवाद साधावा. योग्य मूल्यमापन व आत्मपरीक्षण करून रोजगाराची दिशा निश्चित करावी. भावी पिढीसाठी मार्गदर्शक अशा उपक्रमासाठी विदर्भ साहित्य संघ नेहमीच तत्पर राहील, असे उद्गार अध्यक्षीय भाषणात प्रदीप दाते यांनी काढले.
प्रास्ताविकात स्नेहल फुणसे यांनी भाषा संचालनालयाच्या कार्याची इत्यंभूत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वृषाली देशपांडे यांनी केले. अतिथींचे स्वागत विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांनी केले.