नटराज निकेतन संस्थेचे पाणी संवर्धनासाठी ऐतिहासिक पाऊल  

0

‘वॉटर जीनियस’ परीक्षेत देशभरातील ३ लाखाहून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

नागपूर (Nagpur), १ फेब्रुवारी २०२५: वाढत्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने “वॉटर जीनियस – स्वयं जागृतीतून विश्व जागृती” या परीक्षेचे जागतिक स्तरावर शनिवारी १ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले. नटराज निकेतन संस्था, सामविद इंटरनॅशनल प्रा. लि. (सायन्स अँड टेक्नॉलॉजी ग्रुप), वॉटरशॉपी वर्ल्डवाइड आणि वन हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परीक्षेत तब्बल ३ लाखांहून अधिक विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले. यात महाराष्ट्र, राजस्थान, मुंबई, मध्यप्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, जम्मू काश्मीर आणि तामिळनाडू येथील परीक्षार्थींचा सहभाग होता.

परीक्षेची संकल्पना जलतज्ज्ञ श्री. मुकुंद विलास पात्रीकर यांनी मांडली असून, नटराज निकेतन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंगलाताई पात्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. या परीक्षेचा उद्देश पाणी संवर्धन, जलसुरक्षा, जलप्रदूषण, जल कायदे आणि जल आरोग्य याविषयी व्यापक जनजागृती निर्माण करणे असून यात ६ ते ८० वयोगटातील विद्यार्थी तथा नागरिकांनी भाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ही परीक्षा शैक्षणिक संस्थांमध्ये ऑफलाइन, तर इतर संस्थांसाठी ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आली. विशेषतः १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा “जल तज्ञ” म्हणून करिअर घडवण्याची एक अनोखी संधी ठरली. १०० गुणांच्या या परीक्षेत जलसंधारण, पाण्याची गुणवत्ता, जल व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला होता.

मिसेस इंडिया यूएमबी २०२४ आणि प्रसिद्ध फॅशन इन्फ्ल्यूएनसर मिसेस मधुलिका जगदाळे या परीक्षेच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. तसेच, युवा  अ‍ॅम्बेसेडर गार्गी मुकुंद पात्रीकर (इयत्ता तिसरी) आणि गायत्री निखिल व्यास (एमबीबीएस प्रथम वर्ष) यांनीही या मोहिमेला मोठा पाठिंबा दिला.

या अभियानाचा पुढील टप्पा अधिक व्यापक असणार आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत तब्बल १ कोटी लोकांना “वॉटर जीनियस – स्वयं जागृतीतून विश्व जागृती” या परीक्षेत सहभागी करून, पाणी समस्या सोडवण्यासाठी जागतिक स्तरावर तज्ञ घडवण्याचा संस्थांचा संकल्प आहे. जलतज्ज्ञ श्री. मुकुंद विलास पात्रीकर यांनी पाण्यासंबंधी जनजागृतीसाठी घेतलेला “वॉटर जीनियस” हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पाणी संवर्धनाबद्दल जागरूकता वाढण्यास मोठी मदत होईल आणि भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षा सुनिश्चित केली जाईल.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अ‍ॅडव्होकेट मधुरा व्यास, समविद इंटरनॅशनल चे निखिल व्यास, हर्षदा पात्रीकर, पायल जाचक, अदिती सारावे, आकाश सूर्यवंशी, आकाश बोकडे, शेखर रेड्डी, विनोद बरबटे आणि वैशाली शिंदेकर यांनी मोलाचे योगदान दिले.

जल संवर्धनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना गती देणारे ठरणार आहे.