

नागपूर (Nagpur) 26 सप्टेंबर :- विदर्भाला कवींची मोठी परंपरा लाभली आहे. गेल्या 125 वर्षांच्या कालखंडात विदर्भातील कवींनी मोठी कामगिरी केली आहे. गुणगुंजन काव्य, भावगीत परंपरा, राष्ट्रवादी कविता, सामाजिक कविता, साम्यवादी कविता, अस्तित्ववादी कविता, आंबेडकरवादी कविता, आदिवासी कविता अशा विविध प्रकारांत विदर्भातील कवींनी आपला ठसा उमटवला आहे, असे प्रतिपादन डॉ. अक्षयकुमार काळे यांनी केले. विदर्भ साहित्य संघातर्फे ‘कविता डॉट कॉम- विदर्भ कवितेचे नवे युग’ या ज्येष्ठ कवयित्री मनीषा अतुल यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात झालेल्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, अप्पर आयुक्त (आदिवासी विभाग) (भा.प्र.से) रवींद्र ठाकरे, प्रमुख अतिथी 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, रा.तु.म. विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख, तसेच भाष्यकार डॉ. शैलेंद्र लेंडे, कविता संग्रहाच्या संपादिका मनीषा अतुल उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
डॉ. अक्षयकुमार काळे (Dr. Akshay Kumar Kale) पुढे म्हणाले, कुठल्याही संपादित ग्रंथामध्ये कालक्रमाला खूप म हत्त्व आहे. ते पाळलं जायला हवं. क्रोनोलॉजीमध्ये कालगणना शास्त्राला महत्त्व आहे. संपादक हा शास्त्राशी बांधलेला असतो. त्याला शास्त्राप्रमाणे काम करायला हवं. या संग्रहाचं नाव कविता डॉट कॉम असं आहे. ते आधुनिक वाटतं. पण त्यामुळे वैदर्भीय कवितेला महत्त्व कमी मिळालं असं मला वाटतं. विदर्भाला मोठ्या कवींची परंपरा लाभली आहे. कवीजवळ प्रतिभा नसेल तर त्या कविता सुचू शकत नाही. काव्यामध्ये शब्दांना अतिशय महत्त्व आहे. ज्या वैभवशाली काव्य परंपरेचे आपण वारसदार आहोत ही गोष्ट नवकवींनी लक्षात ठेवावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविकात मनीषा अतुल म्हणाल्या, विदर्भातील गेल्या 40 वर्षांतील कविता आपल्याला या ग्रंथातून मिळेल. कविता विदर्भाची हा आशा सावदेकरांचा एकमेव ग्रंथ आमच्यापुढे होता. माझ्यासमोर तीन पिढ्या होत्या. तीन पिढ्यांचे कवी कसे यात घ्यायचे हा प्रश्न होता. पण तो सुवर्णमध्य साधण्याचा मी प्रयत्न केलाय. वेगवेगळ्या काव्यप्रवाहातील कवी, विदर्भातील सर्व प्रांतांच्या कवींचा यात समावेश व्हावा, याचा मी प्रयत्न केला आहे. 2000 ते 2015 या काळातील कवींचा यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर कविता डॉट कॉम-वैदर्भीय कवितेचे नवे युग या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी रवींद्र ठाकरे म्हणाले, कवितासंग्रहात सर्वांना स्थान देणे हे एक जिकरीचं काम आहे ते मनीषाताईंनी केलं आहे. कवी असणं वेगळं आणि कवितांचं संपादन करून योग्य कवितांना स्थान देणं याकरिता वेगळं सामर्थ्य लागतं. एक चांगली साहित्यकृती जन्माला आली आहे. कवीमध्ये संवेदनशीलता असते, तसेच प्रशासकीय काम करणारे देखील संवेदनशील असायला हवे. नाहीतर ते यंत्रवत ठरतील, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात प्रदीप दाते म्हणाले, कविता डॉट कॉम-विदर्भ कवितेचे नवे युग या संग्रहामध्ये ज्यांचा समावेश झाला अशा सर्व कवींचे मी आभार मानतो. मान्यवरांनी जी अभ्यासक मतं मांडली ती पुढील पिढीला मार्गदर्शक ठरतील, असे ते म्हणाले भाष्यकार डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी, या संपादित ग्रंथांतून अनेक कवींना स्थान मिळाले आहे. संपूर्ण काव्य दृष्टी आणि काव्य सृष्टी या संपादित ग्रंथामधून बघायला मिळते. 1990 नंतर च्या कवितांना संपादित करण्याचे काम मनीषा अतुल यांनी या ग्रंथाद्वारे केले आहे. या ग्रंथाला अतिशय साक्षेपित प्रस्तावना लाभली आहे. यातून वैदर्भीय नव्वदोत्तरी कविता आपल्यापुढे आली आहे आणि त्या कवितांची उकल प्रस्तावनेतून त्यांनी केली. या ग्रंथाच्या प्रस्तावनेचा स्वतंत्र विचार करावा लागेल. नव्या साहित्याचा अदमास या ग्रंथातून पाहायला मिळतो. या ग्रंथामध्ये अनेक प्रवाहांना संपादित केले असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.
कार्यक्रमाला सरचिटणीस विलास मानेकर, उपाध्यक्ष राजेंद्र डोळके, सना पंडित, नितीन सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.