

7 जूनला NDA खासदारांची बैठक बोलावली
18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. भाजपला 240 जागा मिळाल्या, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा 32 जागा कमी आहेत. मात्र, एनडीएने 292 जागांसह बहुमताचा आकडा पार केला. PM मोदी 8 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. याआधी 7 जून रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक होणार आहे. जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी या बैठकीची माहिती दिली आहे. NDA आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक
येत्या 7 जून रोजी दुपारी 2 वाजता बैठक होईल. या बैठकीला सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
आज दिल्लीतील 7 लोककल्याण मार्गावर असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा देऊ शकतात आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात. दुपारी चार वाजता एनडीएच्या घटक पक्षांची बैठकही होणार आहे. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू उपस्थित राहणार आहेत. पीएम मोदींनी काल या दोघांना फोन करून बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले होते.
आठ जूनला पंतप्रधान मोदी यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. शपथविधी लांबणीवर पडल्यास विरोधी पक्ष हालचाली करू शकतात. त्याची खबरदारी म्हणून आजच बैठकीत खातेवाटपावर चर्चा होणार आहे.
———-
भाजप 93 जागा गमावल्या
हिंदी पट्ट्याने दिला मोठा धक्का
भाजपने आपल्याच गोटात मोठी आघाडी गमावली. उत्तर भारतात पसरलेल्या 10 हिंदी भाषिक राज्यांमध्ये पक्षाने 55 जागा गमावल्या. निकाल- या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. मंगळवारी रात्री 10 वाजेपर्यंत भाजप एकूण 240 जागांवर आघाडीवर होता किंवा जिंकत होता. 2019 मध्ये भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे एकूण 64 जागांचे नुकसान झाले. 2002 ते 2012 दरम्यान गुजरातमध्ये झालेल्या 3 विधानसभा निवडणुका असोत किंवा 2014 पासून झालेल्या 3 लोकसभा निवडणुका असोत, नरेंद्र मोदींना त्यांच्या पक्षाला बहुमत न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
—-
ठाकरेंच्या मतदारसंघात गडकरींना मताधिक्य
नागपूर लोकसभा 2024
विदर्भातील निकाल भाजपसाठीच नव्हे, तर काँग्रेससाठीही धक्कादायक आहेत. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या या प्रदेशात तसा कुठलाही सकारात्मक संकेत किंवा अनुकूलता दिसत नसताना आपल्याला पाच जागा मिळतील, असे खुद्द नाना पटोलेंना स्वप्नातही वाटले नसेल. विदर्भातील नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळविला. गडकरींनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवली. पहिल्या फेरीच्या मतदानात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार व पश्चिम नागपूरचे आमदार यांच्या मतदार संघातून मताधिक्य घेतले.
उत्तरकाशीत थंडीमुळे 4 ट्रेकर्सचा मृत्यू
8 अजूनही अडकलेले, 10 जणांची सुटका
उत्तरकाशीतील सहस्त्रताल ट्रेकिंगच्या मार्गावर गेलेल्या 22 जणांच्या ग्रुपपैकी 4 जणांचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे. 8 जण अजूनही अडकलेले आहे. जमीन आणि हवाई मार्गाने त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जीव गमावलेल्या चार सदस्यांचे मृतदेह अद्याप ट्रेकिंग मार्गावर आहेत. उर्वरित 10 ट्रॅकर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतेही अपडेट मिळालेले नाही. एसडीआरएफची टीम बचावकार्यासाठी रवाना झाली आहे. डेहराडून येथून एसडीआरएफ, उत्तराखंड पोलिसांच्या दोन तुकड्या बचावकार्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. यासोबतच एक टीम बॅकअप म्हणून ठेवण्यात आली आहे. ब्रीफिंगनंतर कमांडर मणिकांत मिश्रा यांनी बचावकार्यासाठी पथके पाठवली आहेत. सहस्त्रताल 4400 मीटर उंचीवर आहे.
आणखी एका पालकाला अटक
बोगस आरटीई प्रवेश
मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) पाल्याला नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर करणाऱ्या आणखी एका पालकाला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. मोहम्मद जावेद मोहम्मद युनूस शेख (रा. देशपांडे लेआऊट, नंदनवन) असे अटकेतील पालकाचे नाव आहे. आतापर्यंत पोलिसांनी ३ पालकांना अटक केली असून अन्य १४ आरोपी पालकांचा शोध पोलीस घेत आहे.
नागपूरच्या अभियंत्याला जन्मठेप
पाकिस्तानी एजंटला माहिती पुरविली
ब्रह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याचे सिद्ध झाल्याने निशांत प्रदीप अग्रवाल (वय ३२, रा. नेहरूनगर, रुडकी, जि. हरिद्वार, उत्तराखंड) याला सोमवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय गुपिते कायद्यांतर्गत झालेली नागपुरातील ही पहिलीच शिक्षा मानली जात आहे. निशांतकडील ब्रह्मोसबाबतची गोपनीय माहिती इस्लामाबादस्थित ‘आयएसआय’च्या एजंटपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे.