आता अर्थसंकल्पाचीही ” फाळणी ” करण्याचा काँग्रेसचा इरादा!

0

कल्याण येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

धर्माच्या नावाने देशाची फाळणी करणाऱ्या काँग्रेसला आता धर्माच्या नावावर देशाच्या अर्थसंकल्पाचेही विभाजन करावयाचे असून हिंदू आणि मुस्लिमांकरिता स्वतंत्र अर्थसंकल्प लागू करण्याचा काँग्रेसचा विचार आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी  कल्याण येथे जाहीर प्रचार सभेत केला.

 

कल्याण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भिवंडी मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत श्री. मोदी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी यावेळी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांना अभिवादन करून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाचा प्रारंभ केला.

 श्री. मोदी म्हणाले की, कल्याणच्या भूमीवर राष्ट्रकल्याणासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. गरीबांचे कल्याण हे आजच्या राजकारणाच्या कसोटीचे मुख्य केंद्र बनले आहे. देशातील 25 कोटी गरीब पहिल्यांदाच गरीबीतून मुक्त झाले आहेत. गरीबांना प्रथमच मोफत पक्की घरे मिळाली आहेत, पहिल्यांदाच प्रत्येक घऱाला नळाद्वारे पाणी देण्याची मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे, प्रत्येक गरीबीकडे आज मोफत आरोग्य सेवेचे गॅरंटी कार्ड आहे, सारा देश हे यश अभिमानाने अनुभवत आहे, असे त्यांनी सांगितले. सरकार बनल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत काय कामे करायची, कोणते निर्णय घ्यायचे, यावर आम्ही सातत्याने काम केले आहे. आज जेवढी मेहनत करत आहोत, तितकीच मेहनत 4 जूननंतरही करत राहू, म्हणूनच, पुढच्या शंभर दिवसांत काय करायचे याची ब्लू प्रिंट तयार करून आम्ही पुढे जात आहोत, असे ते म्हणाले. हा माझ्या आत्मविश्वासाचा मुद्दा नाही, तर जनता जनार्दनाच्या विश्वासाचा आहे. देशाच्या नवयुवकांकडे कल्पकता आहे, नावीन्यपूर्ण काही करण्याची उमेद आहे, त्यामुळे युवकांनी त्यांच्या कल्पना मला पाठवाव्यात, माझ्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमास पुढे 25 दिवस जोडून मी त्यावर काम करेन, अशी ग्वाही श्री. मोदी यांनी दिली. देशाचे युवक मला देशाच्या विकासाचे, भविष्याचे नवे विचार देईल, असा विश्वासही  मोदी यांनी व्यक्त केला. पुढचे चार महिने असा एक भक्कम पाया तयार करणार आहे, त्याद्वारे 2047 च्या विकसित भारताचे माझे संकल्प अधिक दृढतेने पार पाडता येतील. तुमची स्वप्ने हाच माझा संकल्प आहे, आणि तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्ये क्षण तुमच्या आणि देशासाठी समर्पित असेल, अशी ग्वाहीदेखील मोदी यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की ,आज भारत यशाच्या एका शिखरावर पोहोचला आहे. गेल्या दहा वर्षात देशाच्या प्रत्येक क्षेत्रात नवी उर्जा, नवा विश्वास, नवी गती प्राप्त झाली आहे. ज्यांनी अनेक पिढ्यांना गरीबी हटाओ च्या घोषणा देत स्वप्ने दाखविली, प्रत्येक निवडणुकीत याच स्वप्नाची अफूची गोळी जनतेस दिली, ज्यांनी भ्रष्टाचाराला शिष्टाचार ठरविले, ते लोक देशाचे नेतृत्व करू शकत नाहीत. जनतेची स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत, पुढच्या पिढीचे भविष्य निश्चित करू शकत नाहीत. देशाची ही यशस्वी वाटचाल  गती कायम ठएवून देशाची वाटचाल अशीच पुढे नेण्याचे काम आम्हीच करू शकतो. महाराष्ट्रातील मागील  सरकारने विकासाच्या सर्व कामांना ब्रेक लावला. आम्ही तो ब्रेक बाजूला केला, आता विकास वेगवान झाला असून रोजगाराच्या संधी वाढतील, नव्या योजना अंमलात येतील. काँग्रेस कधीच विकासाची भाषा बोलत नाही. ते केवळ हिंदू मुस्लीम करत राहतात. केवळ मतपेढीचा विकास हेच काँग्रेसचे धोरण आहे. हिंदू-मुस्लीम  करणाऱ्या काँग्रेसला मी सातत्याने उघडे पाडले आहे, असे मोदी म्हणाले. देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क मुस्लिमांचा  आहे, असे काँग्रेसचे नेते आपल्या सत्ताकाळात उघडपणे सांगत होते. आता देशाच्या अर्थसंकल्पावरही त्यांचा डोळा असून त्यापैकी 15 टक्के निधी मुस्लिमांसाठी देण्याचा त्यांचा विचार आहे. याआधीही त्यांनी हाच प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता, आम्ही त्यास विरोध करून तो हाणून पाडला, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने धर्माच्या आधारावर देशाची फाळणी केली, आता हिंदू आणि मुस्लिमांकरिता स्वतंत्र अर्थसंकल्प आणून धर्माच्या आधारावर अर्थसंकल्पाचीही फाळणी करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असे सांगून, हिंमत असेल तर काँग्रेसने याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही श्री. मोदी यांनी दिले.

पहिल्या चार टप्प्यांत महाराष्ट्राने काँग्रेस व इंडी आघाडीला चारीमुंड्या चीत केले आहे. आजही काँग्रेस व इंडी आघाडी तुष्टीकरणाचा खेळ खेळत आहे. एससी, एसटी ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणावर त्यांचा डोळा असून कर्नाटकात ज्याप्रमाणे रातोरात मुस्लिमांना ओबीसी आरक्षण बहाल केले, तीच लूट आता संपूर्ण देशात करण्याचा काँग्रेसचा इरादा आहे, असा आरोपही त्यांनी केला. आता व्होट  जिहाद करायला निघालेल्या काँग्रेसला  इंडी आघाडीतील एकाही पक्षाने विरोध केला नाही, उलट आम्हीच कर्तव्य म्हणून हा डाव उघड केला आहे. माझ्या प्रतिमेपेक्षा मला माझ्या देशाची एकता महत्वाची आहे, असे सांगून, त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही मोदी यांनी दिला.

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मोठ्या दाव्याने खळबळ

चार जून नंतर ठाकरे गट आणि शरद पवार गट पुन्हा फुटणार असा मोठा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक खळबळजनक ट्विट केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘फिर से खेला होबे’ असे म्हणत त्यांनी चार जूननंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप येईल आणि ठाकरे आणि शरद पवार गट फुटणार असे ट्विट केले आहे.

भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू
इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घटना
मध्यप्रदेशातील इंदोर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरा दोन वाहनांच्या धडकेत 8 जण घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घाटबिल्लाडजवळ एका अज्ञात वाहनाने जीपला धडक दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक रूपेश कुमार द्विवेदी यांनी सांगितले की, इंदूर अहमदाबाद रोडवरील बेटमाजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये एमपी 43 बीडी 1005 क्रमांकाची कार रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला धडकली. घटनास्थळी वाळू पसरलेली असल्याने डंपर वाळूने भरला असल्याची शंका आहे. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

केरळमध्ये ३१ मे च्या सुमारास मान्सून येणार
हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज
मे महिन्याची १५ तारीख संपल्यानंतर सर्वांना मान्सूनबाबत उत्सुकता लागलेली असते. मागील वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. काही दिवसापूर्वी हवामान विभागाने मान्सूनबाबत अपडेट दिली होती. या वर्षी मान्सूनची सुरूवात लवकर होऊ शकते. हवामान विभागाने तारीखही जाहीर केली आहे. केरळमध्ये ३१ मे च्या सुमारास मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतात १६ मे आणि १८ मे पासून पूर्व भारतात उष्णतेची लाटेचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

१७ मे पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय वर्ष वर्ग
कार्यकर्ता विकास वर्ग-२ असे नाव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाला १७ मे पासून नागपुरातील रेशीमबाग परिसरात सुरुवात होत आहे. यंदापासून या वर्गातील अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, त्याला कार्यकर्ता विकास वर्ग-२ असे नाव देण्यात आले आहे. संघाच्या संघटनात्मक बांधणीत प्रशिक्षणवर्गांना फार महत्त्व आहे. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात आयोजित हा वर्ग २५ दिवस चालणार आहे. १० जून रोजी संपणार आहे. या वर्गात या शिबिरात पूर्वीच्या सर्व वर्गांचे प्रशिक्षण घेतलेले देशभरातील स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. संघाच्या संघटनात्मक बांधणीत प्रशिक्षणवर्गांना फार महत्त्व आहे. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात आयोजित हा वर्ग २५ दिवस चालणार आहे. १० जून रोजी संपणार आहे. या वर्गात या शिबिरात पूर्वीच्या सर्व वर्गांचे प्रशिक्षण घेतलेले देशभरातील स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी बैठक
पावसाळ्याआधी गतीने पूर्ण करण्याचे निर्देश

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक सर्व कामे पावसाळ्याआधी गतीने पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी बुधवारी दिले. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय समितीची सहावी बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस विभागीय आयुक्त बिदरी या दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई
बनावट नोटा चलनात; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. लोहमार्ग पोलिसांनी ७० हजार ५०० किंमतीच्या बनावट नोटा आरोपींकडून जप्त केल्या आहेत. तर उर्वरित नोटा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी खर्च केल्याची बाब तपासात स्पष्ट झाली आहे.

“PM नरेंद्र मोदी 2029 पर्यंत पंतप्रधान राहणार
अरविंद केजरीवाल यांचे अमित शहा यांना थेट प्रत्युत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना शाह म्हणाले, “PM नरेंद्र मोदी 2029 पर्यंत पंतप्रधान राहणार आहेत आणि अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे, 2029 नंतरही पंतप्रधान मोदीच भाजपचे नेतृत्व करतील.

१६ ते १९ मे दरम्यान आयोजन
नागपुरात आंबा, मिलेट व धान्य महोत्सव

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या नागपूर येथील विभागीय कार्यालयातर्फे पहिल्यादांच नागपुरात आंबा, मिलेट व धान्य अशा एकत्रित महोत्सवाचे आयोजन १६ ते १९ मे दरम्यान करण्यात आले आहे. शहरातील उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे भवन येथे आयोजित या महोत्सवाचे कृषी पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे संचालक अजय कडू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. या अनुषंगाने महराष्ट्र श्री अन्न अभियान सुरु करण्यात आले आहे.