
नवी दिल्ली(New Delhi) 12 जून :- पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी त्यांच्या समर्थकांना त्यांच्या समाज माध्यमांवरील हँडल्सवरून “मोदी का परिवार” ही टॅगलाईन काढून टाकण्याची विनंती केली आहे.
देशातील नागरिकांच्या सातत्यपूर्ण समर्थनाबद्दल मोदींनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘निवडणूक प्रचारादरम्यान, अनेकांनी “मोदी का परिवार” अशी टॅगलाईन स्वत:च्या समाज माध्यमांच्या प्रोफाइलमध्ये जोडली होती , जे माझ्याविषयीच्या त्यांच्या प्रेमाचे प्रतीक होते’, असे ते म्हणाले . समाज माध्यमांवरील हँडल्सवर दिसणारे नाव बदलू शकते, मात्र भारताच्या प्रगतीसाठी एक परिवार म्हणून आपले बंधन मजबूत आणि अभंग राहील,असे मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
“निवडणूक प्रचारादरम्यान, देशभरातील लोकांनी माझ्याप्रति प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांच्या समाज माध्यम हँडल्सवर ‘मोदी का परिवार’ असे लिहिले होते . यातून मला खूपच बळ मिळाले. देशातील लोकांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सलग तिसऱ्यांदा बहुमत दिले आहे, हा एक प्रकारे विक्रम आहे आणि आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी काम सुरू ठेवण्यासाठी आम्हाला जनादेश दिला आहे.
सर्वांनी मिळून एक कुटुंब असल्याचा संदेश प्रभावीपणे दिल्यानंतर, मी पुन्हा एकदा देशातील लोकांचे आभार मानतो आणि तुम्हाला विनंती करतो की, कृपया आता तुमच्या समाज माध्यम हँडल्सवरून ‘मोदी का परिवार’ हा उल्लेख काढून टाका. समाज माध्यमांवरील हँडल्सवरील दर्शनी नाव बदलू शकते, परंतु देशाच्या प्रगतीसाठी एक परिवार म्हणून आपले बंधन मजबूत आणि अभंग राहील.”