
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येक उद्यानाला ०१ कोटींचा निधी मंजूर
राजुरा, (प्रतिनिधी) : राजुरा मतदार संघातील राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी या सहा महत्त्वाच्या ठिकाणी पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक नागरिकांसाठी हरित मोकळी जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘नमो उद्यान’ साकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या मागणीला यश आले असून, राजुरा विधानसभेतील प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात या उद्यानासाठी शासनाकडून ०१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या उद्यानांमुळे नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात स्वच्छ, हरित आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. उद्यानांमध्ये नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यामध्ये बसण्याची व्यवस्था, फुलझाडे, पथदिवे, लहान मुलांसाठी खेळणी, व्यायामाची साधने, तसेच पाणीपुरवठा आणि सौंदर्यीकरण यांचा समावेश आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, या उद्यानांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याची भावना व्यक्त केली आहे.
नमो उद्यानामुळे पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि नागरिकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारणे या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आमदार भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या विकासकामांमुळे राजुरा मतदार संघात हरित क्रांतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. लवकरच या उद्यानांच्या बांधकामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.