
(Nagpur)नागपूर : सांस्कृतिक कार्य मंत्रालय, भारत सरकार, निर्झर कला संस्था, गुरु कुंदनलाल गंगाणी फाउंडेशन आणि गुरु साधना फाऊंडेशन यांच्यातर्फे दिल्ली शहरातील लोक कला भवन येथे ‘कथक अश्वमेध’ या आंतरराष्ट्रीय कथक नृत्य स्पर्धेचा ग्रँड फिनाले नुकताच आयोजित करण्यात आला होता. वरिष्ठ गटात तृतीय पारितोषिक नागपूरच्या रिद्धी मेहरने मिळवत चमकदार कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत कनिष्ठ गटात पुण्याच्या नमिता नवले आणि वरिष्ठ गटात मैत्रेयी निर्गुण यांना प्रथम पारितोषिक पटकावले. कनिष्ठ गटात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दिल्लीच्या मृणालिनी चौधरी व पुण्याच्या सृष्टी हिरवे यांना तर तृतीय पारितोषिक पुण्याच्या शरिव पोंक्षे यांना देण्यात आले. वरिष्ठ गटात द्वितीय पारितोषिक गुवाहाटीच्या देबरती चौधरी यांना तर तृतीय पारितोषिक धमतारीच्या उपासना भास्कर आणि नागपूरच्या रिद्धी मेहर यांना संयुक्तपणे देण्यात आले.
‘कथक अश्वमेध’ या आंतरराष्ट्रीय कथक नृत्य स्पर्धेची प्राथमिक फेरी देशभरातील 40 वेगवेगळ्या शहरांमध्ये घेण्यात आली होती. त्यातून उपांत्य फेरीसाठी 28 स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यापैकी सर्वोत्कृष्ट 12 स्पर्धकांनी दिल्ली येथे झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये आपली कला सादर केली.
लखनऊ घराण्याचे कथ्थक गुरू सुभाष चंद्र भट्टाचार्य, बनारस घराण्याच्या प्रसिद्ध नर्तक जोडी नलिनी-कमलिनी, जयपूर घराण्याच्या कथ्थक निलाक्षी खांडकर आणि प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना डॉ. चंदना राऊल यांनी परीक्षकाची भूमिका बजावली. स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. येत्या वर्षभरात अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना विविध व्यासपीठांवर सादरीकरण करण्याची संधी दिली जाईल, अशी घोषणा यावेळी नलिनी-कमलिनी यांनी केली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा फेब्रुवारी 2024 मध्ये नागपुरात होणार आहे.