

नागपूर : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत वाईट असल्याची टीका करताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. उपराजधानी नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून संत्रा नगरीची ओळख आता चोरांची नगरी म्हणावे अशी झाल्याची टीका त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करुन केली. (Winter Assembly Session-2023) विधिमंडळाच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी हा आरोप केला. विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. (Leader Of Opposition Vijay Wadettiwar)
वडेट्टीवार म्हणाले की, नागपूरसह विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर घरफोड्या होत आहेत. राज्यातील वातावरणही चांगले नाही. त्यामुळे उपराजधानीची ही स्थिती असेल तर राज्यात गुंतवणूक कशी येणार? राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत. राज्यात वर्षभरात २२ हजार ७४६ आत्महत्या झाल्याचा आकडा पुढे आला आहे. कर्जबाजारी आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. आता अवकाळी पावसामुळे राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारची दुष्काळ जाहीर करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळणार नाही. एकप्रकारे राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी आम्ही अधिवेशनात उचलून धरणार आहोत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
राज्यात बीड हा सर्वात दुष्काळी जिल्हा असताना राज्य सरकार सरकार आपल्या दारी सारख्या प्रचारी कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते आहे. सरकारी तिजोरीची लूट सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
विधिमंडळाचे अधिवेशन किमान पंधरा दिवसांचे असावे, अशी आमची मागणी होती. मात्र, सरकार अधिवेशनाबाबत गंभीर नसून केवळ १० दिवसांचे कामकाज ठरविण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.