

स्व. अजित दिवाडकर (Ajit Diwadkar)यांची श्रद्धांजली सभा
नागपूर,(NAGPUR)
शहरातील विखुरलेले कलावंत एकत्र यावे, वैचारिक व कलात्मक आदान-प्रदान व्हावी, त्यांना आपली कला प्रदर्शित करता यावी या उद्देशाने ‘नागपुरी कलाकार कट्टा’ या अभिनव उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला असून याची शुभारंभ रविवार दि. २१ जुलै २०२४ पासून होत आहे.
त्यानिमित्ताने गिरीशभाऊ गांधी खुले रंगमंच, विष्णूजी की रसोई परिसर, बजाजनगर येथे सकाळी १० वाजता ‘नागपुरी कलाकार कट्ट्यावर ज्येष्ठ अभिनेते स्व. अजित दिवाडकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजीत करण्यात आलेली आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते श्री. देवेंद्र दोडके (Well-known actor Shri. Devendra Dodke)हे नाट्यवाचन करतील.
पूर्वी, धनवटे रंगमंदिराची वास्तू ही कलाकारांचा कट्टा म्हणून परिचित होती. शहरातील सर्व कलावंत तेथे एकत्रित येत असत. अनेक विषयांवर चर्चा झडत आणि नवनव्या कल्पना उदयाला येत असत. काळाच्या ओघात हा कट्टा बंद झाला आणि कलाकार विखुरले गेले. त्यामुळे सांस्कृतिक विश्वाला कळा आली.
नागपूरच्या सांस्कृतिक क्षेत्राला परत एकदा भरभराटीचे दिवस बघता यावे, इतरत्र सुरू असलेल्या उपक्रमांची कलाकारांना माहिती व्हावी, नवनवीन उपक्रमांना चालना मिळावी आणि नागपूरच्या कलानगरीला वेगळे वैभव प्राप्त व्हावे, या उदात्त हेतूने ‘नागपुरी कलाकार कट्टा’ सुरू करण्यात आला आहे.
सर्व कलाक्षेत्रातील कलाकारांसाठी हा मंच खुला राहणार असून या कट्टयावर ते आपली कला सादर करु शकतील. कलाकारांना ‘नागपुरी कलाकार कट्टा’ मदतीचा हात पुढे करीत असून या कट्टयावर जास्तीत जास्त कलाकारांनी सहभागी व्हावे व या कट्ट्यावरील पहिल्या उपक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘नागपुरी कलाकार कट्टा’ तर्फे करण्यात आले आहे.