Nagpur News : अजित पवार यांना संपविण्यासाठी चौकशी ; विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा

0

नागपूर(Nagpur) १ जुलै :- “लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांची राज्यातील उपयुक्तता कमी झाल्यामुळेच भाजप त्यांना विधानसभेच्या पुढील निवडणुकीत सहभागी करून घेऊ इच्छित नाही, कदाचित त्यामुळेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा शिखर बँक गैरव्यवहाराची चौकशी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

त्यांना बदनाम करून संपविण्याचा प्रयत्न नव्याने करण्याचे हे षडयंत्र आहे,” असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. “महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी आणि देहूतील इंद्रायणी नदी वारकरी संप्रदायासाठी पवित्र मानली जाते.

संजीवन समाधी सोहळा, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला या इंद्रायणीच्या घाटावर लाखो वारकरी येतात. उद्योगातील रसायनयुक्त पाणी थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे वारंवार ही नदी प्रदूषित होते.

तरीही सरकारकडून कुठलीही कारवाई होत नाही. उद्योगांकडून वसुली केली जात आहे,” असा आरोप वडट्टीवार यांनी केला. हे उद्योग माणसांचे आयुष्य कमी करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष होत, असेल तर ते दुर्दैव आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

विजय अभिमानास्पद !

नुकत्याच झालेल्या टी २० विश्व करंडक स्पर्धेतील भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील अंतिम क्रिकेट सामना अतिशय चुरशीचा झाला. या सामन्याने सगळ्यांच्या हृदयाचे ठोके चुकले असतील. शेवटच्या षटकामध्ये आपला संघ जिंकेल, असा विश्वास होता. तो खरा ठरला, असेही वडेट्टीवार म्हणाले.