

प्रा. राजेंद्र सिंह सायन्स एक्सप्लोरेटरी येथे आयोजन
नागपूर (Nagpur) 1 सप्टेंबर :- प्रा. राजेंद्र सिंह सायन्स एक्सप्लोरेटरी येथे पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा रविवारी आयोजित करण्यात आली होती. केवळ एक्सप्लोरेटरीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत विज्ञानाचे विविध प्रयोग करणाऱ्या लहानग्यांनी पर्यावरणपूरक गणपती तयार केले. विद्यार्थ्यांना कलाकार व निवृत्त सहयोगी प्रा., फॅशन आणि टेक्सटाईल डिझायनिंग, निकालस महिला महाविद्यालय राजश्री बापट यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मातीच्या या मूर्ती मध्ये विद्यार्थ्यांनी तुळशीच्या बियांचा वापर केला. मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यानंतर हे बियाणे जमिनीत लावले जाऊ शकतात. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी एक्सप्लोरेटरीच्या शिक्षक राधिका कायंदे आणि श्री. राहुल लांजे यांचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ. सीमा उबाळे, संचालिका आणि केंद्रप्रमुख श्री. रवींद्र जोशी हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिखा व्यास, शैक्षणिक प्रमुख यांनी केले.