फडणवीस मदतीला धावले, काठमांडूवरून पर्यटक परतले

0

नागपूर NAGPUR – 6 लाख रुपये द्या म्हणून पर्यटन कंपनीने हात वर करून नेपाळमध्ये अडकवून ठेवलेले. जवळ पैसे नाहीत,अनेक नेत्यांना आणि त्यांच्या पीएला फोन करून मदत मागितली. पण प्रतिसाद मिळेना. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मदतीला धावले आणि महाराष्ट्रातील सर्व यात्रेकरू सुखरूप पोहचले. फडणवीस यांना मेसेज केला आणि त्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत व्हीआयपी ट्रिटमेंट मिळून हे भाविक रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचले. देवेंद्र फडणवीस आमच्या मदतीला धावून आल्याची सुखद भावना पर्यटकांनी व्यक्त केली.
यासंदर्भात एक भाविक संजू म्हात्रे यांनी सांगितले की, आम्ही रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील 58 भाविक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेलो होतो. यात 35 महिला आणि 23 पुरुष होते. गोरखपूरहून नेपाळपर्यंत सगळे व्यवस्थित पोहोचले. लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेत काठमांडूला आल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये बसवले गेले.. तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत. सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही, असे या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी धमकावयला सुरूवात केली. अनोळखी गावात उद‌्भवलेल्या या प्रसंगामुळे काय करायचे हा प्रश्न या भाविकांसमोर उभा राहिला. त्यांनी नेत्यांना आणि त्यांच्या पीएला फोन करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना. शेवटी संजू म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून सर्व प्रसंग सांगितला. त्यांचा तातडीने प्रतिसाद आला. त्यांनी माहिती घेतली. लगेचच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला आणि गावाकडे परतण्याचा मार्ग प्रशस्त झाला.