

Nagpur(नागपूर) :- सुपारी देत, ‘हिट ॲण्ड रन’च्या माध्यमातून सासऱ्याचा खून
केल्याप्रकरणी अर्चना पुट्टेवारच्या आणखी एका साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दुसरीकडे कारागृहात असलेल्या अर्चना पुट्टेवार (वय ५३) हिची न्यायालयातून तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळविली.
संकेत हिरामण घोडमारे (वय २३, रा. जुना बगडंगज) असे सातव्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आतापर्यंत अर्चना पुट्टेवार यांच्यासह प्रशांत पार्लेवार, नीरज निमजे (वय ३२) व सचिन धार्मिक (वय ३०),
सार्थक बागडे, अर्चना यांची खासगी सचिव पायल नागेश्वर यांना अटक केली. दरम्यान अपघात करताना, कारमध्ये त्यांच्यासोबत संकेत घोडमारेही उपस्थित असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, त्याला पोलिसांनी अटक केली.
अर्चना यांनी सहा महिन्यापूर्वीच सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांना मारण्याचा कट आखला होता. त्यातून त्यांनी दोनदा त्यांच्यावर हल्लाही केला होता. त्यात अटक केल्यावर तीनच दिवसात अर्चना पुट्टेवार यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते.
मात्र, सार्थक बागडे याला दोन दिवसांपूर्वी अटक केल्यावर त्याचे आणि तिचे संबंध असल्याने अर्चना पुट्टेवार यांना विचारपूस करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्चना यांच्या कोठडीसाठी अर्ज केला होता. आज त्यांना न्यायालयात हजर केल्यावर त्यांची पुन्हा तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.