या उड्डाणपूलामुळे केवळ 15 मिनिटात पोहोचाल इथे!

0
  नागपूर : नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग 53 वरील वाडी येथील चार पदरी उड्डाणपुलाचे बांधकामामुळे आता नागपूरच्या व्हरायटी चौकातून नागपूर शहरा बाहेर जाण्यास केवळ  15 मिनिटं वेळ लागणार असून यामुळे नागपूर अमरावती रस्त्यावरील वाहतूक ही सुरळीत होणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले.  नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चार पदरी उड्डाणपूलाचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  झालं त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी या क्षेत्राचे आमदार समीर मेघे प्रामुख्याने उपस्थित होते . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे   सुमारे 246 कोटी रुपयांच्या  तरतुदीने  2.3 किलोमीटर  बांधलेल्या  या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ कॅम्पस चौक ते वाडी पोलीस ठाणे यातील प्रवासाचा वेळ 25 मिनिटा वरून  8 मिनिटांवर  येणार आहे यामुळे वाडी परिसरातील वाहतुकीची वर्दळ कमी होणार आहे .याच कार्यक्रमात नागपूर अमरावती मार्गावरील व्हरायटी चौक ते बोले पेट्रोल पंप चौक आणि विद्यापीठ परिसर चौक ते वाडी पर्यंत रस्त्याचे 4.89 किमीचे व्हाईट टॉपिंग सिमेंट काँक्रिट रस्ते बांधकामाचे देखील लोकार्पण झाले. या दोन्ही प्रकल्पाची एकूण किंमत 323  कोटीआहे  .  नागपूर अमरावती रस्त्यावरील  या पुलाच्या दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.या उड्डाणपुलामुळे अमरावती ते नागपूर महामार्गावरील मोठ्या चौकात सुरक्षा उपाययोजनेत वाढ झाली आहे .

याप्रसंगी वाडी परिसरातील विविध विकासकामाविषयी  गडकरींनी  माहिती दिली  अमरावती रोडवरील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवर साडेचारशे कोटी रुपये खर्च करून जागतिक दर्जाचा ऍग्रो कन्व्हेन्शन सेंटरच्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ अडीच हजार  लोकांची आसन व्यवस्था असणारा एक वातानुकूलित सभागृह आपण बांधणार आहोत. त्याचप्रमाणे  या कन्व्हेन्शन सेंटर मध्ये वर्षभर कृषी प्रदर्शन चालू राहणार आहे आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागपूर शहर,  जिल्हा आणि वाडी परिसरातल्या दहा हजार तरुण मुलामुलींना रोजगार मिळणार आहे असे गडकरींनी यावेळी स्पष्ट केले. या उडानपुलाच्या खाली सुद्धा लाईट बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली .  याप्रसंगी या उड्डाणपुलाच्या बांधकामात सहभाग असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा तसेच बांधकामाच्या कंत्राटदारांचा सत्कार गडकरींच्या हस्ते करण्यात आला

या क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी सांगितलं की 2022 ला या उड्डाणपुलाचे भूमिपूजन गडकरींच्या हस्ते  झाले आणि केवळ तीसच महिन्यात हा उड्डाणपूल तयार झाला असून वाडी परिसरात   भुयारी गटार,  नगरपरिषदेच्या इमारतीचे बांधकाम , हिंगणा रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण असे अनेक विकास कामे झाली आहेत. याप्रसंगी या उडानपुलावर लेझरलाईट आणि फायरशोचे देखील आयोजन करण्यात आले होते
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता   संतोष शेलार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर या विभागाचे अधीक्षक अभियंता एन व्ही बोरकर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी ,परिसरातील नागरिक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते .