

– नीरीचे शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश कुंभारे यांचा सल्ला
– राष्ट्रीय संयोजकांची द्विवार्षिक कार्यशाळा
नागपूर, 15 फेब्रुवारी
जनआक्रोेश या संस्थेने प्रारंभापासून रस्ते सुरक्षा हा विषय लावून धरला, आता त्यात ध्वनी प्रदुषण नियंत्रणाची भर पडली असून यात तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दोन्ही महत्वपूर्ण संदेश सामाजिक स्तरावर अधिक प्रभावीपणे मांडता येतील असा सल्ला नीरीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश कुंभारे यांनी दिला.
रस्ते सुरक्षा क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून कार्यरत जनआक्रोश या संस्थेचा देशभरात विस्तार झाल्यानंतर विविध शहरातील राष्ट्रीय संयोजकांची द्विवार्षिक कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी सकाळी नीरी सभागृहात करण्यात आले. ‘ सडक सुरक्षा एवं ध्वनी प्रदुषण नियंत्रण’ हा या द्विदिवसीय कार्यशाळेचा विषय आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नीरीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश कुंभारे, प्रमुख वक्ते म्हणून दै. हितवाचे संपादक विजय फणशीकर, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश खांडेकर, सचिव रवींद्र कासखेडीकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित संयोजकांशी संवाद साधताना डॉ. प्रकाश कुंभारे यांनी, नीरी पर्यावरण व ध्वनी प्रदुषण नियंत्रणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे, जनआक्रोशने रस्ता सुरक्षेसोबत प्रदुषण नियंत्रणाच्या क्षेत्रात काम सुरू केल्याने नीरी कायम त्यांच्या पाठीशी राहिल असे आश्वासन दिले, तसेच आमच्याकडे विकसित तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रात करणे शक्य आहे, यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय तंत्रज्ञान) वापर देखील या सामाजिक सुरक्षा उपक्रमात करणे शक्य आहे. त्यासाठी दोन्ही संस्थांनी एकत्रित पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकातून अध्यक्ष प्रकाश खांडेकर यांनी, मागील 12 वर्षापासून जनआक्रोश कार्यरत आहे, आता देशाच्या विविध शहरातील विस्तारानंतर प्रमुख संयोजकांची कार्यशाळा येथे होत आहे. आगामी काळात वाहनचालकांची मानसिकता बदलण्याचे कठीण काम आपल्याला करायचे आहे, यासोबतच प्राथमिक शिक्षणापासून रस्ते व वाहतूक सुरक्षेचा अभ्यासक्रम शासनाने लागू करावा या मागण्यांसाठी काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यशाळेच्या प्रारंभी दीपप्रज्वलनानंतर आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा व्हीडीओ संदेश सादर करण्यात आला. यानंतर जनआक्रोशचे पालक जे. बी. मेहता यांनी दृकश्राव्य माध्यमातून संयोजकांशी संवाद साधला. जनआक्रोशच्या गीतानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात बुटीबोरी येथील लिथियम बॅटरी युनिटचे संचालक संदीप शिरखेडकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन मिलिंद रहाटगावकर यांनी तर आभारप्रदर्शन संदीप अग्रवाल यांनी केले. राष्ट्रगीताने उद्घाटन सत्राची सांगता झाली.
चौकट
जनआक्रोश जीवनशैली होणार : विजय फणशीकर
नागपुरातील जनआक्रोश या छोट्या बिजाचा आता वटवृक्ष झाला आहे. आम्ही वृत्तपत्र म्हणून अशी जागृती करीत असतो, पण राज्यकर्त्यांना त्याची दखल घ्यावी असे वाटत नाही, जनआक्रोशमुळे बरीच जनजागृती झाली असून आता ती जीवनशैली होण्याच्या मार्गावर असल्याचा विश्वास हितवादचे संपादक विजय फणशीकर यांनी व्यक्त केला. पूर्वी असलेले घरगुती व शालेय संस्कारांचा विसर पडल्याने जनआक्रोशसारख्या संस्थेची समाजाला गरज असल्याचे फणशीकर यांनी सांगितले.