मृतावर केले परस्पर अंत्यसंस्कार नातेवाईकांचा संताप

0

 

अमरावती- अमरावती शहरातील चवरे नगर येथे राहणारा 28 वर्षीय युवक प्रदीप महादेव अडांगे हा 22 डिसेंबरला कृषी उत्पन्न बाजार समिती येथून बेपत्ता झाला. बेपत्ता झाल्याची तक्रार 24 डिसेंबरला सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. तर दुसरीकडे प्रदीप अडांगे हा बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोंडेश्वर येथील वीटभट्टी येथील परिसरात 23 डिसेंबरला मृत अवस्थेत सापडल्याने त्याला बडनेरा पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवस ठेवले. बडनेरा पोलिसांनी सर्वत्र माहिती दिली. बडनेरा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदीप अडांगे यांच्या नातेवाईकांचा शोध लागू न शकल्याने प्रदीप अडांगे यांच्या पार्थिवावर बडनेरा पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. आज 31 डिसेंबर रोजी बडनेरा पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली असता बडनेरा पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे नातेवाईकांना धक्काच बसला. या घटनेवर नातेवाईकांनी बडनेरा पोलीस व शहर कोतवाली पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त केला. बेपत्ता व्यक्तीची नोंद होऊनही त्याची माहिती नातेवाईकांना का देण्यात आली नाही? इर्विन शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असतानाही त्याच पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल होऊनही संबंधितांना का कळविण्यात आले नाही? असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला. नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत आपली व्यथा मांडत, आक्रोश व्यक्त केला.