जगाशी स्‍पर्धा करण्‍यासाठी उत्पादन निर्मिती केंद्र व्‍हावे

0

पद्मभूषण डॉ. अजय चौधरी विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनच्या जाहीर व्याख्यानाला उदंड प्रतिसाद

 

नागपूर(Nagpur), 02 जून 2024:- जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आणि दरडोई जीडीपीमध्ये लक्षणीय वाढ साध्य करण्यासाठी, भारताने सेवा प्रदाता होण्यापेक्षा आपले लक्ष उत्पादन निर्मिती केंद्र बनण्याकडे वळवले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मभूषण आणि एचसीएलचे सह-संस्थापक डॉ. अजय चौधरी(Dr. Ajay Chaudhary)यांनी केले.
विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन (VMA) तर्फे पर्सिस्टंट सिस्टम्स ऑडिटोरियम मध्‍ये आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. तंत्रज्ञान आणि उद्योजकता क्षेत्रातील प्रख्यात डॉ. चौधरी यांनी “नोट्स ऑन टेक्नॉलॉजी, आंत्रप्रेन्योरशिप अँड द फ्युचर” या मध्यवर्ती संकल्पनेवर आपले विचार मांडले.

भारतीय अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे धनी असून, त्‍यातील अनेक जण बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नेतृत्व करत आहे. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी, आपली उत्पादन क्षमता लक्षणीयरीत्या वाढवली पाहिजे आणि जागतिक बाजारपेठेत स्वतःला उत्पादक देश म्हणून स्थापित केले पाहिजे. उत्पादनामुळे केवळ एक परिसंस्था निर्माण होत नाही तर रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि एकूण विकासाला चालना मिळते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आपल्याकडे उत्पादने तयार करण्याची आणि विकण्याची क्षमता असताना स्वतःला व्यापार करण्यापर्यंतच का मर्यादित ठेवायचे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

देशात व्यवसाय करण्याच्या वाढत्या सुलभतेवर प्रकाश टाकून डॉ. चौधरी यांनी तरुण उद्योजकांना बाजारपेठेतील गरजा ओळखून उत्पादन निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी सेवा उद्योगाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या धोक्याबद्दल देखील सावध केले.

डॉ. चौधरी यांनी A > R या सूत्रावर जोर दिला. ते म्हणाले की, आकांक्षा-(एस्पीरेशन) या संसाधनांपेक्षा (रिसोर्स) मोठ्या असतात आहेत. तुमच्या आकांक्षा दृढ असल्यास, संसाधन आपोआप सुकर होतात. एचसीएलचे सह-संस्थापक, नॅशनल क्वांटम मिशन ऑफ इंडियाच्या मिशन गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष आणि “जस्ट ॲस्पायर” या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक् डॉ. चौधरी यांचे भाषण प्रेरणादायी आणि अंतरदृष्टि देणारे ठरले. इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटर, मायक्रोप्रोसेसर आणि संगणक तयार करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या सहा अभियंत्यांचा ‘एचसीएल’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निर्मितीचा रोमांचक प्रवास त्यांनी सांगितला. स्ट्रॅटेजिक रिसोर्स मॅनेजमेंट आणि बिझनेस प्लॅनिंगद्वारे, ही छोटी कंपनी $6 बिलियन किमतीची जागतिक कंपनी बनली असे त्यांनी सांगितले.

व्हीएमएचे अध्यक्ष प्रवीण पंचभाई यांनी डॉ. चौधरी यांचा सत्कार केला व उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सचिन जहागीरदार यांनी डॉ. चौधरी यांचा परिचय करून दिला. सूत्रधार पवन सारडा होते तर संयोजक निकेत अग्रवाल आणि सुमित पृथियानी होते. विदर्भ लिटफेस्टने या कार्यक्रमाला पाठिंबा दिला तर ब्रेड्स एन बियॉन्ड आणि रोशन रिअल इस्टेटचेदेखील सहकार्य लाभले.