

बस्तर आणि दंडकारण्यातील आदिवासींच्या वेदनांना जगासमोर मांडणारा निर्भीड पत्रकार मुकेश चंद्राकर (Mukesh Chandrakar) यांची निघृण हत्या झाली आहे. बीजापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुकेशने आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात अनेक अडचणींवर मात केली. ईटीव्हीवरून पत्रकारितेची सुरुवात करत, नंतर न्यूज 18 छत्तीसगड आणि शेवटी बस्तर जंक्शन या यूट्यूब चॅनलद्वारे त्यांनी दंडकारण्यातील आदिवासींच्या व्यथा, माओवादी चळवळींची सत्यता आणि सुरक्षा दलांचा संघर्ष प्रभावीपणे जगासमोर मांडला.
मुकेशने बस्तरच्या घनदाट जंगलांतील आदिवासींचे प्रश्न समजून घेतले आणि त्यांचं दुःख जगासमोर मांडण्यासाठी पत्रकारितेत पाऊल ठेवलं. त्यांच्या बस्तर जंक्शन चॅनलवर त्यांनी माओवाद्यांच्या कॅम्पचे थेट प्रक्षेपण करत खळबळ उडवली होती. त्यांनी माओवादी चळवळींचा अभ्यास करून सुरक्षा दलांवर होणाऱ्या हल्ल्यांमागील योजना उघड केल्या.
गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह बीजापूर जिल्ह्यातील एका ठेकेदाराच्या घरामागील सेप्टिक टँकमध्ये आढळला. त्यांनी एका रस्त्याच्या कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात त्यांची हत्या झाल्याची शक्यता आहे.
मुकेश चंद्राकर यांची हत्या केवळ त्यांचा आवाज दाबण्यासाठीच नव्हे, तर सत्य उघड करण्याच्या निडर वृत्तीला आव्हान देणारी आहे. दंडकारण्यातील पत्रकारांमध्ये संतापाचा आगडोंब उसळला आहे. या घटनेमुळे बस्तरच्या पत्रकारितेला मोठा हादरा बसला आहे.
मुकेश यांची पत्रकारिता, संघर्ष, आणि समर्पण नेहमीच प्रेरणादायी ठरेल. सत्याची कास धरणाऱ्या पत्रकारांना सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा समोर आला आहे.
दंडकारण्यातील सत्याचा आवाज गमावला, मात्र त्यांचा लढा अमर आहे. मुकेश चंद्राकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!