मनपाची ॲम्बुलन्स, शववाहिका खाजगी पेक्षा महाग…

0

१ एप्रिल पासून पाच पट दरवाढ

पुन्हा एकदा गाडीवर नोटा उधळल्या : जनविकास सेनेचे ‘घे पैसा’ आंदोलन

चंद्रपूर (CHANDRAPUR) :
१ एप्रिल २०२५ पासून चंद्रपूर महानगरपालिकेने ॲम्बुलन्स,शव वाहिका, पाण्याचे टँकर इत्यादी मूलभूत सेवांच्या दरात मोठी वाढ केली. या दरवाढीने संतप्त झालेल्या जनविकास सेनेने संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात पुन्हा एकदा आयुक्तांच्या गाडीवर नोटांची उधळण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्त व त्यांची गाडी नसल्याने यावेळी उपायुक्त मंगेश खवले यांच्या गाडीवर नोटा उधळण्यात आल्या.


मनपा प्रशासन व आयुक्त विपिन पालीवाल यांना केवळ पैशाची भूक आहे हे दर्शविण्यासाठी जनविकास सेनेने पुन्हा एकदा ‘घे पैसा’ आंदोलन केले.आज १६ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या दरम्यान गांधी चौकातील मनपा इमारतीसमोर ‘घे पैसा’ आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिका आता व्यापारी प्रतिष्ठान झाले असुन आयुक्त व्यापारी झाल्याची प्रतिक्रिया यावेळी देशमुख यांनी दिली.

२०० ऐवजी आता १ हजार रुपये भाडे…
पेट्रोल-डिझेलचा खर्चही खाजगीपेक्षा जास्त

शहराच्या हद्दीमध्ये यापूर्वी मनपाच्या ॲम्बुलन्सची सेवा निशुल्क होती. आता यासाठी ५०० रुपये भाडे आकारण्यात आले. मनपा हद्दीच्या बाहेर ॲम्बुलन्स व शव वाहिकेसाठी साठी २०० रुपये भाडे आकारण्यात येत होते. १ एप्रिल पासुन मनपा यासाठी २०० ऐवजी १००० रुपये म्हणजेच पाचपट भाडे आकारण्यात येणार आहे. खाजगी ॲम्बुलन्स व शव वाहिका चालक १५ किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल- डिझेलचा खर्च घेतात. मनपा ॲम्बुलन्ससाठी १० किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल व शव वाहिकेसाठी ८ किलोमीटर मागे एक लिटर डिझेल घेत असल्याने इंधनाचा खर्चही जास्त लागणार आहे.याचा मोठा फटका शहरातील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू लोकांना बसणार आहे.

१०० गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही..पप्पू देशमुख

आयुक्त विपिन पालीवाल यांनी जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध आजपर्यंत अनेक खोट्या तक्रारी दाखल केल्या.कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले. आमची लढाई ही चंद्रपूर शहरातील ४ लक्ष नागरिकांच्या हिताची लढाई आहे. पैशाच्या हव्यासापोटी मनपाच्या तिजोरीची लूट करणाऱ्या कोणत्याही घोटाळेबाज अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही.आयुक्तांनी १०० तक्रारी केल्या व १०० गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. यासाठीच पुन्हा एकदा नोटांची उधळण केली. आयुक्तांनी १०० तक्रारी कराव्या. आम्ही एकच तक्रार करणार आणि आयुक्त पालीवाल सर्व घोटाळेबाजांसह जेलमध्ये जाणार हे त्यांनी लक्षात ठेवावे.

दर आठवड्याला एक घोटाळा उघडकीस आणणार

चंद्रपूर शहराची दुर्दशा करणाऱ्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जनविकास सेना दर आठवड्याला एक घोटाळा उघडकीस आणणार आहे. सोबतच एक लक्ष स्वाक्षऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून पुराव्यासह सर्व घोटाळ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल. या तक्रारीच्या अनुषंगाने एसआयटी मार्फत चौकशी व कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.