

नागपूर (NAGPUR). नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल (Additional Commissioner of Nagpur Municipal Corporation Smt. Aanchal Goyal)यांची मुंबई शहर, मुंबई च्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी १८ मार्च २०२५ रोजी यासंदर्भात आदेश निर्गमित केले.
२०१४ बॅच च्या भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी (IAS) श्रीमती आंचल गोयल यांनी ३१ जुलै २०२३ रोजी नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यापूर्वी त्या परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेला सीईओ म्हणून काम बघितले आहे. सध्या त्यांच्याकडे नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतिरिक्त प्रभार देखील आहे.
नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडताना श्रीमती आंचल गोयल त्यांनी घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, समाजकल्याण विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, परिवहन विभाग, मालमत्ता कर विभाग, वाहतूक विभाग, उद्यान विभाग या विभागांची जबाबदारी सांभाळली.
शहरात त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात आरोग्य मंदिर सुरू झाले. पहिल्यांदा मालमत्ता कराचे अर्थसंकल्पात दिलेले लक्ष्य पूर्ण झाले. शहरातील कचरा गाड्यांचे मॉनिटरिंग संगणकीकृत करण्यात आले. भांडेवाडी येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे युनिट सुरू झाले. शहरात ६१ पार्किंग झोन नोटिफाइड केले. महापालिकेची यंत्रणा ऑनलाईन केली. नवीन उद्यान, व्हर्टिकल गार्डन, रस्त्यांवरील डिव्हायडरवर वृक्षारोपण, महापालिका शाळेतील पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था, पुष्पोत्सव, महापालिका विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षणोत्सव उपक्रम, मिशन नवचेतना माध्यमातून महापालिकेच्या शाळांचा विकास, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आदी गुणवत्तापूर्ण व नावीन्यपूर्ण काम त्यांच्या कार्यकाळात झाले. महापालिकेच्या शाळेतील गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांचे क्लस्टर तयार करून शाळांचा दर्जा वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.