

नागपूर (Nagpur), 31 ऑक्टोबर
नरक चतुर्दशीच्या पर्वावर स्व. प्रदीप केशव पालांदूरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘पहाट कीर्तन’ हा कार्यक्रम रेशीमबाग बगिच्यातील जगदंबा माता मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आला. प्रख्यात वारकरी कीर्तनकार विश्व वारकरी सेवा संस्था नागपूर उपाध्यक्ष ह.भ.प. श्री उमेश्वर बारापात्रे यांनी ‘कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य’ या विषयावर आख्यान सादर केले.
कीर्तनात नरकासुराचा सत्यभामेने केलेल्या वधाची कथा महाराजांनी सविस्तर रंगविली. तसेच, तुकाराम महाराज लिखित ‘संतांची दिवाळी’ ही कशी साजरी होते, यावर फार सुंदर विवेचन केले. संत्संगाने मानवी जीवनाचा होणारा उत्कर्ष यांवर देखील बारापात्रे महाराजांनी फार मर्मभेदी भाष्य केले. महाराजांना अतिशय सुरेल अशी साथ श्री प्रशांत मेहेरकर आणि वारकरी चमू यांनी दिली तर श्री धर्मेंद्र माहूरकर यांनी मृदूंग वादन करून योग्य संगत केली. ह.भ. प. श्री उमेश्वर बारापात्रे यांची उत्कृष्ट भाषाशैली, वारकरी सांप्रदायिक भजन प्रकारावर असलेली पकड, अप्रतिम सादरीकरण आणि मधुर, तयार असलेला पल्लेदार आवाज ही कार्यक्रमाची वैशिष्ट्य होते.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, कलासंगम कला सांस्कृतिक मंडळ आणि केशवनगर सांस्कृतिक सभा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच, विनस स्पोर्टस असोसिएशन आणि जगदंबा माता मंदिर देवस्थान रेशीमबाग यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उद्या लक्ष्मीपूजनानिमित्य स्व. गुलाबराव श्यामराव आकरे यांना समर्पित ‘पहाट वारा’ या भावगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नागपूरचे प्रख्यात गायक श्री विनोद वखरे आणि संच हा कार्यक्रम सादर करतील. आयोजकांतर्फे रसिक प्रेक्षकांना जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येते