

Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
Maharashtra Rain : राज्यासह देशाला सुखावणारी एक दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. मान्सून (Monsoon) अखेर केरळमध्ये (Kerala) दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने (IMD) केली आहे. आठ दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरलं असून आज(25 मे) तिन्ही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढच्या दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. तर आज देखील राज्यातील बहुतांश भागात पावसाचे ढग कायम असल्याचे बघायला मिळत आहे. आज रविवारी, मुंबई आणि मुंबई उपनगरासह ठाण्यात पावसाच्या सरी कोसळत आहे. मुंबईत आज पहाटेपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगर परिसरात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. ठाण्यातही पाऊस सुरु झाला आहे.
मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज (दि.25 मे) कोकण गोव्यातील बहुतांश ठिकाणांसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. यात रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर चंद्रपूर आणि नागपूर भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान विभागाकडून वर्तवली आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचेही समोर आले आहे.
राज्यातल्या 85 तालुक्यांना पावसाचा फटका
राज्यात मे महिन्यातील झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठा नुकसान झालं आहे. राज्यातल्या जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 22 हजार 233 हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झालं आहे. मका, ज्वारी, भाजीपाला, संत्रा, भात, आंबा, फळपिके या पिकांच अवकाळी पावसामुळं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा अमरावती,जळगाव,नाशिक,चंद्रपूर आणि जालना या जिल्ह्यांना बसला आहे.
पालघर जिल्ह्यात पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून अद्याप पावसाची रिप रिप सुरू आहे. या पावसामुळे उन्हाळी भात शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू असल्याने शेतात पिकून आलेला भात शेतकऱ्यांना घरात आणणं कठीण झालं आहे. त्यामुळे हातात तोंडाशी आलेला हा घास या पावसामुळे हिरावून घेतलं जात तो की काय? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.