Monsoon : मुंबई, ठाण्यासह राज्यात मुसळधार, ऑरेंज अलर्ट जारी!

0

मुंबई(Mumbai) १३ जुलै :- मुंबईत कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. तीनही रेल्वे मार्गांवरील वाहतूक उशिराने सुरू असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड, आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

कसारा-सीएसएमटी लोकलच्या डब्यामध्ये गळती लागल्याचे पाहायला मिळाले. डब्यात पावसाचे पाणी गळत असल्याने कसारा-सीएसएमटी या लोकलने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

दादर, वरळी, वांद्रे या उपनगरांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात पावसाचे पाणी शिरले आहे.रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू असून, चिपळूणमध्ये एका कॉलेजची भिंत ढासळल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.वसई, विरार, आणि नालासोपाऱ्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मात्र सुखावले आहेत. राज्यभरात मान्सूनचा पाऊस जोरदारपणे बरसत असून, पुढील चार दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे, तर जळगाव आणि मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.