काँग्रेसच्या उमेदवाराने नियम धाब्यावर बसवले; मनसेने केले आंदोलन

0

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आरक्षणासाठी मनसेचे निदर्शने

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरतीत ओबीसी, एससी, एसटी आणि एनटी प्रवर्गासाठी आरक्षण न दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) जोरदार निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांच्या माध्यमातून मनसेने मागासवर्गीयांना न्याय देण्याची मागणी केली असून, आरक्षण लागू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

मनसेने आरोप केला आहे की, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत आणि संचालक मंडळाने शासनाच्या आरक्षण धोरणाला धाब्यावर बसवून बेकायदेशीर भरती प्रक्रिया राबवली. त्यात ओपन प्रवर्गातील जागा पैसे घेऊन भरण्याचा डाव रचला गेला. त्यामुळे तमाम मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असल्याचा मनसेचा आरोप आहे.

मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे या भरती प्रक्रियेबाबत तक्रार करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोकरभरतीला तात्पुरती स्थगिती दिली. मात्र, आरक्षणाचा प्रश्न अद्याप सोडवला गेला नसल्यामुळे चंद्रपूर येथील बँकेच्या मुख्य शाखेसमोर मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

मनसेने मांडलेले मुद्दे:

  • बँकेच्या नोकरभरतीत मागासवर्गीय आरक्षणाचा अवलंब केला गेला नाही.
  • उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत भरती प्रक्रियेची जबाबदारी आयटीआय कंपनीला न देता अन्य कंपन्यांना देण्यात आली.
  • गोरगरीब विद्यार्थ्यांना संधी मिळणार नसल्याने ही भरती प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी.

या निदर्शनांदरम्यान उपस्थित मनसे नेते सुधीर खापने, रमेश काळबांधे, विजय तूरक्याल, मोहित हिवरकर आदींनी आरक्षणाविषयी ठाम भूमिका घेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी शासन प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून, या प्रकरणावर न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.