
राजकीय वर्तुळात चर्चा
(Mumbai)मुंबई- मनसेचे नेते (Abhijit Panse)अभिजित पानसे यांनी गुरुवारी संजय राऊत यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे आणि (Raj Thackeray)राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या नेत्यांनी एकमेकांची भेट घेतल्यावर संजय राऊत मातोश्रीवर आणि पानसे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती असून मनसेने ठाकरे गटाला टाळी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पानसे आणि संजय राऊत यांच्यात सुमारे पंधरा मिनिटे चर्चा पार पडल्याचे सांगण्यात येते. या दोघांमध्ये यापूर्वीची प्रदीर्घ चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राऊत यांना भेटून बाहेर आलेल्या पानसे यांनी युतीचा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा केलाय. (MP Sanjay Raut meeting with MNS Leader Abhijeet Panse)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, (MP Sanjay Raut) खासदार संजय राऊत यांच्यासोबतची भेट संपताच पानसे हे थेट राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झाले. तर, संजय राऊत तातडीने मातोश्रीवर दाखल झाले. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना पानसे यांनी दावा केला की, संजय राऊत यांना युतीचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. मी फार छोटा माणूस आहे. दोन नेत्यांनी एकत्र यायचे की नाही, याचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. तसा काही प्रस्ताव असलाच तर पक्षातील वरिष्ठ नेते यावर चर्चा करतील. संजय राऊत यांची व माझी जुनी ओळख आहे. अनेक दिवसांपासून त्यांची भेट झाली नव्हती. तसेच, माझे काही खासगी काम होते. या कामांसाठीच संजय राऊतांची भेट घेतली, असा दावाही त्यांनी केला.