
दुर्गापूर येथील वार्ड क्र. ३ मधील झोपडपट्टीमध्ये घालवले आनंदाचे क्षण
निरागस हास्यामध्ये दडला आहे दिवाळीचा खरा आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार
मिठाई, शालेय साहित्य, गृहोपयोगी वस्तूंचे केले वितरण
चंद्रपूर(Chandrapur) – सर्वसामान्य जनतेला आपले कुटुंब मानणारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आणखी एका कृतीतून समाजापुढे उत्तम आदर्श निर्माण केला आहे. आपल्या कुटुंबासोबत चौकटीच्या आत साजरी होणारी दिवाळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील मुलांमध्ये जाऊन साजरी केली. या मुलांसोबत दीपोत्सव साजरा करताना आ. श्री. मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील नागरिकांना अंधारातून उजेडाच्या प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या.
दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील झोपडपट्टीमध्ये आ. श्री. मुनगंटीवार यांच्या येण्याने आनंदाचे वातावरण होते. लहान मुला-मुलींसह येथील नागरिकांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले. यावेळी रुद्र नारायण तिवारी,श्रीनिवास जंगमवार, नरेंद्र सिंग दारी, केमा रायपुरे, हनुमान काकडे, अनिता भोयर, राकेश गौरकार,विलास टेंभुर्णे, देवानंद थोरात,अर्चनाताई रायपुरे, सुनील भरेकर, रंजना किन्नाके,भोजराज शिंदे,अरविंद बोरकर,सुरेखा थोरात, रवि रामटेके आदींची उपस्थिती होती.
साध्या पण मनाला स्पर्शून जाणाऱ्या या उपक्रमात मुलांच्या निरागस चेहऱ्यावरील हास्य, त्यांच्या डोळ्यांतील आनंद आणि ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाने वातावरण भारावले होते. मिठाई, शालेय साहित्य तसेच गृहोपयोगी वस्तू देखील यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी वितरित केल्या. ‘निरागस हास्यामध्ये दिवाळीचा खरा आनंद दडला आहे,’ अशी भावना आ. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

ते म्हणाले, “२०४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी याच चिमुकल्यांच्या हातात देशाचे भविष्य असणार आहे. आज आपण त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतली, त्यांना उत्तम संस्कार दिले आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला, तर उद्या भारताला प्रगतीच्या नवनव्या शिखरांवर नेण्याचे काम ही मुले करतील.”
त्यांनी मुलांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी परिश्रम करण्याचा सल्ला दिला. “प्रत्येक मुलामध्ये एक तेजस्वी किरण दडलेला आहे; तो उजळवण्याची जबाबदारी समाजाची आहे,” असेही ते म्हणाले. या भावनिक आणि आनंददायी सोहळ्यात स्थानिक नागरिक, पालक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून चिमुकल्यांसोबत आनंद, मिठाई आणि आत्मीयतेचा दिवाळी सण साजरा केला.













