एमकेएम डिफेंडर्सने पटकावले विजेतेपद

0

व्‍हीडीएल फ्लायर्स उपविजेता, ‘एमकेएम खो-खो प्रिमियर लीग – 2024’

महाराष्‍ट्र क्रीडा मंडळाद्वारे नागपुरात पहिल्‍यांदाच आयोजित करण्‍यात आलेल्‍या तीन दिवसीय ‘एमकेएम खो-खो प्रिमियर लीग – 2024’ स्‍पर्धेची अंतिम फेरी अत्‍यंत अटीतटीची झाली. सलग चार सामने जिंकून थेट अंतिम फेरीत दाखल झालेल्‍या व्‍हीडीएल फ्लायर्सवर एमकेएम डिफेंडर्स संघाने अत्‍यंत चुरशीच्‍या झालेल्‍या साखळी व अंतीम सामन्‍यात सलग मात करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्‍यामुळे व्‍हीडीएल फ्लायर्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

न्यू इंग्लिश हायस्कूल, कॉंग्रेस नगर येथील मैदानावर फ्लड लाईटमध्‍ये तीन दिवस ‘खो-खो प्रिमियर लीग – 2024’ चे सामने रंगले. तिस-या व अंतिम दिवशी सर्व संघांचे साखळी सामने पार पडले. त्‍यात एमकेएम डिफेंडर्सने व्‍हीडीएल फ्लायर्सला हरवत त्‍यांची विजयाची घोडदौड रोखली आणि सर्वाधिक 13 गुण प्राप्‍त केले. त्‍यामुळे अंतिम सामना एमकेएम डिफेंडर्स आणि आधीच अंतीम फेरीत पोहोचलेल्‍या व्‍हीडीएल फ्लायर्स यांच्‍यात झाला. एमकेएम डिफेंडर्सच्‍या खेळाडूंनी अतिशय उत्‍कृष्‍ट खेळी करत व्‍हीडीएल फ्लायर्सचा 4 गुणांनी पराभव केला आणि पहिला-वहिला खो-खो प्रिमियर लीग चषक आपल्‍या नावे केला.

तिस-या व चौथ्‍या स्‍थानासाठी राजमुद्रा वॉरियर्स व स्‍पोर्टस कर्मा यांच्‍यात लढत झाली. त्‍यात स्‍पोर्टस कर्माने राजमुद्रा वॉरियर्सचा 4 गुणांनी पराभव करीत तिसरे स्‍थान पटकावले तर राजमुद्रा वॉरियर्सला चौथ्‍या स्‍थानावर समाधान मानावे लागले.

पारितोषिक वितरण सोहळा
‘एमकेएम खो-खो प्रिमियर लीग – 2024’ स्‍पर्धेच्‍या पार‍ितोषिक वितरण कार्यक्रमाला कॅलडरीचे एशिया पॅसिफिक मार्केटिंग हेड साहिल सुराना, उद्योजक पराग सराफ, महाराष्‍ट्र क्रीडा मंडळाचे अध्‍यक्ष सुमंत चितळे, कार्यकारी उपाध्‍यक्ष डॉ. विजय दातारकर, सचिव डॉ. पद्माकर चारमोडे, सहसचिव डॉ. संजय चौधरी, सचिन देशमुख,वैभव कुमरे यांची उपस्थिती होती. प्रवीण खंगार यांनी भविष्‍यातील स्‍पर्धांच्या आयोजनासाठी तीन लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते स्‍पर्धेतील प्रथम तीन विजेत्‍यांना चषक, वैयक्तिक सुवर्ण, रजत व कास्‍य पदके तसेच बक्षिसे देण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. पद्माकर चारमोडे यांनी केले. पुढील वर्षी दिवाळीमध्‍ये अंडर 17 चे सामने खेळवले जातील, असे ते म्‍हणाले. माजी महापौर संदीप जोशी, डॉ. बबनराव तायवाडे यांनीदेखील खेळाडूंचे अभिनंदन केले.

महत्‍त्‍वपूर्ण योगदान
माजी राष्ट्रीय खेळाडू अश्फाक शेख, प्रशांत खळतकर, मनोहर दीक्षित, राजेश तुमसरे, सुधीर चिटणीस व चंद्रकांत आसोले यांनी मेंटॉर तर भूषण दहासहस्त्र, योगेश घुघूसकर, मनोज गोटेकर, नीतेश पारधे, पंकज करपे, सौरभ दुबे यांनी प्रशिक्षक म्‍हणून काम पाहिले. चेतन दोनाडकर, वंश शेंडे, प्रविण वहाले, चेतन उके, प्रेम राखडे व यश वानखेड़े हे सहायक प्रशिक्षक होते.

या स्पर्धेच्‍या यशस्‍वीतेकरिता मंडळाचे अध्यक्ष सुमंत चितळे, सचिव डॉ. पद्माकर चारमोडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. संजय चौधरी, सचिन देशमुख, वैभव कुमरे, समीर चिटणीस, शशांक बोकारे, समीर लोही, डॉ. राजु राऊत, सुधीर चिटणीस, डॉ. अतुल कुलकर्णी, प्रेम राखडे, प्रविण वहाले, साहिल नागपूरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

स्‍पर्धेचा निकाल
प्रथम विजेता – एमकेएम डिफेंडर्स
द्वितीय विजेता- व्‍हीडीएल फ्लायर्स
तृतीय विजेता– स्‍पोर्टस कर्मा

वैयक्तिक पारितोषिके
उत्‍कृष्‍ट आक्रमक खेळाडू – भाविक बघेल – एमकेएम डिफेंडर्स (रु. 10000/-)
उत्‍कृष्‍ट संरक्षक – सुमीत शनिचरे – व्‍हीडीएल फ्लायर्स (रु. 10000/-)
अष्‍टपैलू खेळाडू (मुले)– गितांशू सुर्यवंशी – राजमुद्रा वॉरियर्स (रु. 11000/-)
अष्‍टपैलू खेळाडू (मुली)– अक्षरा किरंगे – व्‍हीडीएल फ्लायर्स (रु. 10000/-)