मिशन ऑलिम्पिकचा सोशल मीडियात डंका!

0

 

सुधीर मुनगंटीवार यांच्या आगळ्या संकल्पनेची अशीही किमया!

 

 

नागपूर : NAGPUR एखादी गोष्ट कल्पकतेनं साकारण्याचं वेगळेपण काही औरच असतं. साध्या साध्या गोष्टींचीही जरा हटके मांडणी केली की त्या लक्षवेधक ठरतात. इथे तर पाच दिवसांचं, देशपातळीवरच्या एका स्पर्धेचं आयोजन होऊ घातलंय. तेही वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं. सुधीर मुनगंटीवार यांची संकल्पना, नेटकं आयोजन, सुयोग्य नियोजन, काटेकोर आणि चपखल असं व्यवस्थापन या गोष्टींची भूरळ स्पर्धेसाठी देशभरातून चंद्रपुरात दाखल झालेल्या खेळाडूंना पडली नसती तरच नवल! ६७व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी आलेले खेळाडू या स्पर्धेच्या यशामागील बारकाव्यांवर सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागले, त्याला त्यांच्या फालोअर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आणि बघता बघता सोशल मीडियावर अधिराज्य निर्माण व्हावे इतकी या स्पर्धेची चर्चा समाज माध्यमांवर होऊ लागली. मिशन ऑलिम्पिकचा, या स्पर्धेच्या आयोजनामागील उद्दीष्टाचा समाजमाध्यमांवरील बोलबाला चंद्रपूरच काय, संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या नेत्याच्या कौतुकास कारणीभूत ठरतोय.

‘मिशन ऑलिम्पिक 2036’ हे ध्येय डोळ्यांपुढे ठेवून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होऊ घातल्या आहेत. त्याचा रंगतदार आणि देखणा असा उद्घाटन सोहळा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. पुढील पाच दिवस विविध क्रीडा प्रकारांतील स्पर्धांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी हे ही या स्पर्धेच्या आयोजनाचं वेगळेपण ठरते आहे.

भव्यदिव्य स्वरूपात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ‘थीम साँग’ तयार करण्यात आले आहे. या गाण्याला प्रसिद्ध पार्श्वगायक कैलाश खेर यांनी स्वर दिला आहे. ‘आओ चंद्रपूर, खेलो चंद्रपूर… खेलो ऐसा दिल लेलो चंद्रपूर…’ असे शब्द असलेले हे गीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची पेरणी करणारे ठरत आहे. लक्षवेधक शब्द, जोशपूर्ण संगीत आणि कैलाश खेर यांचा भावगर्भित आवाज हे या ‘थीम साँग’ची वैशिष्ट्य ठरत आहे. प्रसिद्ध अभिनेते सलमान खान आणि आमिर खान यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा संदेश प्रसारीत केले आहेत.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करून घेतले आहे. निवासापासून तर भोजनादि विविध व्यवस्थांचं सुयोग्य नियोजन ही देखील लक्षणीय बाब ठरली आहे. या निमित्ताने चंद्रपूर, बल्लारपूर परिसराचा झालेला कायापालटही लक्षवेधक ठरत आहे.

एकूण काय तर, सर्वच बाबतीत ही स्पर्धा, त्याचं नियोजनबद्ध आयोजन दखलपात्र ठरत आहे. दुरुन बघणारे, प्रत्यक्ष अनुभवणारे, असे सारेच लोक त्याची दखल घेत आहेत. सोशल मीडियावर व्यक्त होताहेत. शब्दांतून, फोटोंमधून, सेल्फी घेत, व्हिडिओ टाकत चाललेल्या या कौतुकाने समाजमाध्यमांवर चांगल्या अर्थाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. फेसबुक, व्हाॅट्स ॲप, जुना ट्विटर आणि आताचा एक्स…जिकडे तिकडे या स्पर्धेची चर्चा होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छांनी आणि या स्पर्धेसाठी देशाच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांच्या फालोअर्सनी या प्रसाराचे गणित बेरजेचे केले असून, काही माध्यमांवर तर ही स्पर्धा थेट पहिल्या क्रमांकावर ट्रैंण्ड होते आहे…एका उत्कृष्ट आयोजनाची ती पावती ठरली आहे.