
मुंबई, दि. २७ ऑक्टोबर २०२५: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पीएम जनमन योजनेमध्ये महावितरणने केलेल्या कामगिरीचे व १३१ टक्के उद्दिष्टपूर्तीचे केंद्रीय विदयुत मंत्रालयाने कौतुक केले आहे. याबाबत केंद्रीय ऊर्जा सचिव श्री. पंकज अग्रवाल यांनी राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांना पाठवलेल्या पत्रामध्ये महावितरणच्या कामगिरीचा गौरव केला आहे.
देशातील दुर्गम भागात निवासी व सर्वार्थाने दुर्बळ आदिवासी गट (PVTGs) यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाने पीएम जनमन योजना सुरू केली आहे. दुर्गम भागातील अतिमागास जनजाती समूहांना सुरक्षित घरे, पिण्याचे पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, उपजीविकेच्या संधी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात या योजनेअंतर्गत राज्यातील १६ जिल्ह्यांतील ११३७ गावांमध्ये लाभार्थ्यांना नवीन वीजजोडण्या व त्यासाठी विद्युतीकरणाची कामे महावितरणकडून वेगाने सुरू करण्यात आली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनीही या कामांचा वेळोवेळी आढावा घेतला. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे योजनेमध्ये १३१ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. महाराष्ट्रासाठी ८ हजार ५५६ लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात तब्बल ११ हजार २३५ घरांमध्ये नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे आदि कर्मयोगी अभियान २०२५ची राष्ट्रीय परिषद नुकतीच झाली. पीएम जनमन योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मा. राष्ट्रपती महोदया यांच्याहस्ते केंद्रीय विद्युत मंत्रालयाचा या परिषदेत गौरव करण्यात आला. या गौरवासाठी महाराष्ट्राचा ऊर्जा विभाग व महावितरणचे देखील मोठे योगदान आहे. दुर्गम भागात निवासी आदिवासी गटांच्या घरांचे विद्युतीकरण करण्यासाठी महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीचे कौतुक आहे. आदिवासी कल्याण, सक्षमीकरण व सर्वसमावेशक विकासात महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाचे व महावितरणचे योगदान महत्त्वाचे आहे, असे केंद्रीय ऊर्जा सचिव श्री. पंकज अग्रवाल यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे
















