“लक्षात घ्या, मलाही पक्षाने घरी बसवले होते”: बावनकुळे

0

माढा- “मी १५ वर्षे आमदार व ऊर्जामंत्री म्हणून चांगले काम करूनही पक्षाने मला घरी बसवले होते, हे कायम लक्षात ठेवा”, अशी आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील इच्छूक उमेदवारांना करुन दिली आहे. त्यामुळे नेत्यांनी तिकीट गृहित धरु नये, असा अप्रत्यक्ष इशाराच बावनकुळे यांनी नेत्यांना दिल्याचे बोलले जात आहे. (State BJP President Chandrashekhar Bawankule)
बावनकुळे म्हणाले कीी, भाजपमध्ये तिकीटाचा निर्णय केंद्रीय समिती घेते. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय त्यांचा असतो. पक्ष कोणालाही केव्हाही उमेदवारी देऊ शकतो आणि कोणालाही थांबवू शकतो, असेही बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे हे सध्या माढा लोकसभा मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याने भाजपने दोघांमधील मतभेद दूर करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. माढा लोकसभेची जागा भाजप मोठ्या मताधिक्क्याने जिंकेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
राम मंदिर निमंत्रणावरून खासदार संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर देताना बावनकुळे यांनी सांगितले की, १४० कोटी जनतेला माहिती आहे की राममंदिर कोणामुळे झाले. गेली ५२७ वर्षे रामलल्ला तंबूत होते ते आता २२ जानेवारी रोजी जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जात आहेत. हे घडण्यासाठी मोदी यांना पंतप्रधान बनावे लागले, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.